Ganesh Naik Eknath Shinde Thane ठाणे: पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी ठाण्यात देखील जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला आव्हान देण्याची तयारी भाजपने केली आहे का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मी गडकरी रंगायतनमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार असल्याचं राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी जाहीर केले आहे. मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार असल्याची घोषणा ठाण्यात राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी (28 जानेवारी) केली.
ठाण्यात येत्या निवडणुकीत 'ओन्ली कमळ' फुलवायचेय- गणेश नाईक
ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत 'ओन्ली कमळ' फुलवायचे आहे. शहरातील भाजप नेत्यांची तीच इच्छा आहे, असे सांगत पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे कामही माझेच असल्याचे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले. त्यामुळे एकप्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यात आगामी पालिका निवडणुकांमध्ये (Thane Municipal Corporation Election) महायुतीत जोरदार कलगीतुरा रंगण्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
एकनाथ शिंदेंची एकूणच नाराजी लक्षात घेता हा वाद देखील मोठा होण्याची शक्यता-
गणेश नाईक यांच्या या विधानावर सध्या शिवसेनेची प्रतिक्रिया आलेली नसली तरी नवीन सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेंची एकूणच नाराजी लक्षात घेता हा वाद देखील मोठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिल्याच्या निमित्ताने ठाणे कोपरी मंडल भाजप युवामोर्च्याच्यावतीने नाईक यांचा भव्य नागरी सत्कार कोपरीत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा कार्यक्रम देखील एकनाथ शिंदे यांच्याच मतदारसंघात पार पडला.