Dhananjay Munde Walmik Karad: मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे दिल्लीत आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौरा करत आहे. आज (29 जानेवारी) धनंजय मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भेट होणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्लीत असणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जातायत. पण वाल्मिक कराडवरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का, याची चर्चा सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दीडशेहून अधिक जणांची चौकशी-
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. यात वाल्मिक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी झाली आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. ज्याचा तपास सध्या सीआयडी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित म्हणून एसआयटीकडून तपास सुरू आहे.
माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे भावूक-
धनंजय मुंडे काल माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. माध्यमांनी धनंजय मुंडेंना विरोधकांकडून राजीनामा मागितला जातोय, असा प्रश्न विचारला. यानंतर धनंजय मुंडे थोडे गहिवरल्याचे दिसून आले. धनंजय मुंडे म्हणाले की, ज्यावेळेस व्यक्तिगत तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप होतात, थेट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मूल असेल आणि ती जर तिसरीला शाळेत जात असेल ना...तर त्या मुलीला तिच्या मैत्रिणी आणि मित्र काय म्हणत असतील याचा विचार करा, असं धनंजय मुंडे म्हणाले. राजीनामा या विषयावर मी काही उत्तर देणार नाही, असंही धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.