Naxal Encounter : सलग दुसऱ्या दिवशी माओवाद्यांविरोधी कारवाईला मोठं यश आले आहे. आंध्र प्रदेश, ओडीसा, छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर आंध्रप्रदेश पोलिसांच्या ग्रे हाउंड या विशेष पोलिस पथकाच्या कारवाईमध्ये माओवाद्यांचा खात्मा झाला आहे. आज झालेल्या कारवाईत सात माओवादी मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये मेट्टुरी जोगाराव उर्फ टेक शंकर हा केंद्रीय समिती सदस्य, तसेच डिव्हीसीएम( DVCM) असलेल्या सीता उर्फ ज्योती या 2 मोठ्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत इतर पाच माओवादी ही या चकमकीत मारले गेल्याची माहिती आहे.
Naxal Action : कुख्यात नक्षली हिडमाला कंठस्नान, अन्य 6 नक्षलवाद्यांचा खात्मा
आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या चकमकीत अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत. बस्तरचे महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी पुष्टी केली की, आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम जिल्ह्यातील मरेदपल्ली येथे मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत नक्षलवादी कमांडर हिडमा, ज्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीस होते, तो मारला गेला. या चकमकीत एकूण सहा नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. महानिरीक्षकांच्या मते, 40 लाख रुपयांचे बक्षीस असलेले हिडमाची पत्नी राजे, ज्याच्यावर 40 लाख रुपयांचे बक्षीस होते, ती मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये होती.
Naxal Encounter : एन्काऊंटरनंतर सामान्य ग्रामीण जनतेने फटाके फोडून आनंद व्यक्त
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात तसेच बस्तरमधील अनेक ठिकाणी हिडमा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या सलग दोन दिवस झालेल्या एन्काऊंटरनंतर सामान्य ग्रामीण जनतेने फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी नागरिकांनी नक्षलवाद मुर्दाबादच्या घोषणा देत फटाके फोडले. अवघ्या काही महिन्यांपूर्वी पर्यंत हिडमाचा अशा जाहीर पद्धतीने नाव घेऊन त्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्याची हिंमत सुद्धा कोणी दाखवत नव्हतं, मात्र नक्षलवाद्यांच्या सर्वात धोकादायक आणि अत्यंत क्रूर कमांडरचा खात्मा होताच छत्तीसगडमधील गावोगावी नागरिकांची हिम्मत वाढल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
Naxal Leader Bhupati : आत्मसमर्पण केलेल्या भूपतीचं आपल्या जुन्या सहकाऱ्यांना आवाहन
दुसरीकडे, 15 ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण करणाऱ्या माओवादी नेता आणि माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी तसेच पॉलिट ब्युरोचा वरिष्ठ सदस्य असलेल्या मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ भूपतीने जंगलातील आपल्या सहकाऱ्यांसाठी (ज्यांनी अजून ही शस्त्र खाली ठेवलेले नाही) एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. जग बदललं आहे, देश बदलला आहे, शस्त्राच्या संघर्षामुळे आपले मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत शस्त्राने संघर्ष करणे शक्य नाही. जंगलातील नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारावे, असे आवाहन भूपतीने या व्हिडिओ संदेशातून केले आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही, सर्वांनी विचार करावा, संविधानाचा मार्ग स्वीकारावा
हिडमाच्या एन्काऊंटरच्या घटनेबद्दलही त्याने दुःख व्यक्त करत गेल्या दीड महिन्यापासून आम्ही शस्त्र खाली ठेवून संविधानाचा मार्ग स्वीकारून जनतेमध्ये यावं, जनतेच्या प्रश्नांसाठी काम करावे असे, आव्हान करतो आहे. मात्र माझी विनंती जंगलात शस्त्र घेऊन अजूनही सुरक्षा दलांशी लढा देणाऱ्या नक्षलवाद्यानी ऐकली नाही. अशी खंत भूपती या व्हिडिओ संदेशात व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी विचार करावा आणि शस्त्र खाली ठेवून जंगलाच्या बाहेर यावं. संविधानाचा मार्ग स्वीकारावा, असे आव्हान भूपतीने या व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून जंगलातील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना केले आहे.
आणखी वाचा