गडचिरोली : कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील पाच प्रगतशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौर्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र प्रगत शेतकऱ्यांच्या नावावर दोन राजकीय पदाधिकारी आणि एका राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा समावेश असल्याने ही निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हा अभ्यास दौरा आहे की मर्जीतील व्यक्तींना शासकीय खर्चाने विदेश सहल (Progressive Farmers Study Tour) घडवून आणण्याचा प्रकार? असा आरोप महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी केलाय. सोबतच त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे तक्रार केली आहे.
Gadchiroli News: प्रगतशील शेतकऱ्यांची निवड; पण निवडीचे निकष कोणी, कसे आणि कधी ठरवले?
दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. या दौर्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम खुणे, एका महाविद्यालयाचे संस्थाचालक असलेले अरुण हरडे, राजकीय पदाधिकारी बाळकृष्ण टेंभुर्णे यांच्यासह, चंद्रशेखर मुरतेली, विनोद जक्कनवार या दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही अभ्यास सहल युरोप, इस्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांमध्ये होणार आहे. कृषी विभागाने या दौऱ्यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांची निवड केल्याचा दावा केला आहे. मात्र, हे निकष कोणी, कसे आणि कधी ठरवले, असा प्रश्नही पेंदोरकर यांनी केला आहे.
Yavatmal : वणीच्या दि-वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या अध्यक्षवर अविश्वास प्रस्ताव
यवतमाळच्या वणी येथील दि वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. वसंत जिनिंग मध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार झाला नसून काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना झालेल्या गैरसमजातून ही राजकीय खेळी करण्यात आली आहे. वणी उपविभागात आधीच काँग्रेसला प्रतिनिधित्व नाही. त्यात निवडणुकीच्या तोंडावर अविश्वास ठराव आणणे म्हणजे नेत्यांकडूनच पक्ष खिळखिळा करण्याचा प्रकार असल्याचे मत आशिष खुळसंगे यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या अनुदानात अन्यायकारक वाटप
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या अनुदानात अन्यायकारक वाटप झाल्याचा आरोप होत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याला कमी भरपाई मिळत असल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. शेतकरी गणेश बापूसाहेब वाडेकर यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी येथील सव्वा दोन एकर मका पिकासाठी 15,300 रुपये अनुदान मिळाले, तर मराठवाड्यातील वैजापूर येथे त्यांच्या आजीच्या नावावर असलेल्या चार एकर बागायती मका पिकासाठी केवळ 9, 500 रुपये मिळाले. या तफावतीवर गणेश वाडेकर यांनी सवाल केला की, 'नव्वद गुंठ्यासाठी पंधरा हजार तीनशे रुपये आणि चार एकर जमिनीसाठी नऊ हजार पाचशे रुपये, दोन्हीमध्ये इतकी तफावत कशी असू शकते?'. या अनुदान वाटपातील विषमतेमुळे शेतकरी संघटनेने 27 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
आणखी वाचा