गडचिरोली:  राज्याच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या सोळा  लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवादी  चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा अटक झाली आहे. या अटकेमुळे तीन राज्यातील माओवादी चळवळीला (Gadchiroli News) मोठा हादरा बसला आहे. 


माओवादी चळवळीचे   केंद्र गडचिरोली  जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक तरुण माओवादी चळवळीत गेले आहेत.  14 अक्टोबर रोजी जहाल माओवादी  चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा  वय 48 वर्षे, रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सीमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पोस्टे पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील मौजा जारावंडी ते सोहगाव जाणा-या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली.   


गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील माओवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. 


कोण  चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा? 



  •  26 जून 2000 ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन 2002 कार्यरत

  • 2002 ला एसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2003 पर्यंत कार्यरत

  • 2003 मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सन 2014 पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत.

  • 2014 मध्ये डिव्हीसीएम पदावरुन डिमोशन होऊन एसीएम पदावर  काम केले

  • 2016 साली पुन्हा डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये उप-कमांडर या पदावर आजपर्यंत काम केले

  • 2009 मध्ये  जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग

  •  2009 मध्ये मौजा बालेवाडा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग

  • 2009 मध्ये मौजा बाशिंग (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक

  •  2010 मध्ये मौजा गरपा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग

  •  2011 मध्ये मौजा कोल्हार (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग

  •  मे 2020 मध्ये मौजा पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता.  ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार शहीद झाले होते.

  •  सन 2023 मध्ये मौजा मौजा हिक्केर  जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभाग

  • सन 2010 मध्ये मौजा कोंगाल जि. नारायणपूर (छत्ती.) येथील एका व्यक्तीच्या  खुनात त्याचा सहभाग


गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 71 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे.