गडचिरोली : केंद्र प्रमुखाने बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरी बोलावून कॉपी करण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता या घटनेची प्रशासनाने दखल घेतली आहे. याप्रकरणी तहसीलदारांच्या तक्रारीवरून आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रप्रमुखाने बारावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी सहा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये घेतले होते. यातीलच एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाला पैसे देतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता आरोपी प्राध्यापक किशोर कोल्हे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका बाजूला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून कॉपी मुक्त परीक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे परीक्षेत गैरप्रकार सुरूच आहेत. बुलढाण्यात मास्तरांनीच बारावीचा गणिताचा पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असताना दुसरीकडे गडचिरोलीतही शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी प्रकरणात सहकार्य करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चक्क केंद्रप्रमुखाने कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या रूमवर बोलावून प्रत्येकी पाचशे रुपये घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षागृहात कॉपी करू देण्याची मुभा देण्याचा प्रकार धक्कादायक आहे. बोर्डाचे भरारी पथक येण्याआधी तातडीने सूचना देण्याचीही माहिती या व्हिडीओत सांगितली जात आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गडचिरोलीच्या शिक्षण विभागाने आरोपी शिक्षक किशोर कोल्हे यांना केंद्रप्रमुख पदावरून हटविले आहे. या संपूर्ण वायरल व्हिडीओची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी राजेंद्र निकम यांनी दिले होते. आता तहसिलदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हायरल झालेल्या वेळापत्रकामुळे अनेकंचा हिंदीचा पेपर बुडाला
दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वायरल झालेल्या वेळापत्रकाचा फटका बसला आहे. व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवून अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला आहे. दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर होता. हॉल तिकीटावर देखील 8 मार्च रोजी हिंदी द्वितीय भाषा विषयाचा पेपर असल्याचं बोर्डाकडून नमूद केलेलं आहे. मात्र 8 मार्चला हिंदीचा पेपर असतानासुद्धा काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवला.
दरम्यान, विद्यार्थ्यांचा पेपर चुकणं आणि व्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांची आणि पालकांचीच चूक आहे आणि या आधीसुद्धा वेळापत्रकाविषयी बोर्डाने अनेकदा सूचना केल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षा देण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचंही बोर्डाने स्पष्ट केलंय.