Gadchiroli Rain : राज्यात विविध ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं कहर केला आहे. भामरागड-आलापल्ली  मार्गावरील अनेक छोट्या नाल्यांना पूर आला आहे. त्यापैकी तूमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं या परिसरातील लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. या नाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, या भागातील लोक आपला जीव मुठीत धरुन पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत आहेत. दरम्यान पुढच्या 72 तासात गडचिरोलीत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सर्व अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्याची माहितीही त्यांनी दिली. चंद्रा गावाजवळील नाल्यावरुन देखील पाणी वाहत होते. दरम्यान, पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मागील दोन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. गडचिरोलीच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळं रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काल या पुरात एक ट्रक देखील वाहून गेल्याची घटना घडली होती. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता.


NDRF आणि SDRF च्या टीम अलर्ट


दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना देखील मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं नदी नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी गावात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. राज्यातील मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात या भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच गडचिरोलीमध्ये देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तिथे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, वाशिम, वर्धा जिल्ह्यातही मोठा पाऊस कोसळताना दिसत आहे.


महत्वाच्या बातम्या: