गडचिरोली : नक्षलवादी (Naxal) विरोधातील लढाईला गडचिरोली पोलीस (Gadchiroli Police) दलास मोठे यश आले आहे. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी शोध अभियान राबवताना तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चकमक, जाळपोळ, हत्या आदींमध्ये सहभाग होता. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दी कोयार जंगल परीसरात गोपनीय माहितीच्या आधारे शोध अभियान राबविण्यात आले. गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असताना दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत गट्टा -जांबिया हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात एका जहाल नक्षलवाद्यस अटक करण्यात यश मिळाले आहे.


कोयार जंगल परिसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो (29 वर्षे रा. कोयार ता. भामरागड बक्षीस 4 लाख रुपये),  तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी (23 वर्षे रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली बक्षीस 4 लाख रुपये) तर मौजा झारेवाडा जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (27  वर्ष रा. झारेवाडा ता. एटापल्ली बक्षीस 2 लाख) यांचा समावेश आहे.


अटक करण्यात आलेल्या सदस्यांची माहिती


रमेश पल्लो  


दलममधील कार्यकाळ



  •  2019 साली भरती होऊन कंपनी 10 चा अॅक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता. 

  • सध्या  तो स्कॉऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता.

  • तीन खून, आठ चकमक, एक  जाळपोळ आणि इतर अशा एकूण 13 गुन्ह्यांमध्ये त्याचा समावेश आहे.


तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी


दलममधील कार्यकाळ



  • जुलै 2015 मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली. 

  •  2016 ते 2019 पर्यंत ती प्लाटुन क्र. सातमध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.

  • सन 2019 ते आतापर्यंत ती कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती

  • चार खून आणि  तीन चकमक अशा एकूण सात गुन्ह्यांमध्ये समावेश आहे


 अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे


 दलममधील कार्यकाळ



  •  2010 साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती झाला. 2013 पर्यंत कार्यरत होता.

  • 2013 पासून प्लॉटुन क्र. 14 मध्ये कार्यरत होता. 

  • ऑगस्ट 2013 मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली झाली. 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता.  

  • मे 2018  ते आजपर्यंत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता.

  • सात खून, नऊ चकमक, दोन जाळपोळ, दोन दरोडे, एक जबरी चोरी आणि इतर तीन अशा एकूण 24 गुन्ह्यांमध्ये समावेश आहे.


गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकूण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे.