गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) नक्षल विरोधी मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. चकमकी, जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या जहाल नक्षलवाद्यास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र वेलादी (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव आहे. अहेरी तालुक्यातील दामरंचा गावाजवळून त्याला ताब्यात घेण्यात आले. महेंद्र हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील चेरपल्ली येथील रहिवासी असून, तो 2009 मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. सुरुवातीला पुरवठा समिती आणि सध्या नॅशनल पार्क एरियामध्ये, त्यानंतर सँड्रा दलममध्ये कार्यरत होता. सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असून, या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात. आज महेंद्र वेलादी हा दामरंचाजवळच्या इंद्रावती नदी परिसरात पोलिसांच्या हालचालींची माहिती देण्याच्या हेतूने फिरत होता. त्यावेळी विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या 9 क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांनी त्यास अटक केली. दामरंचा आणि मन्नेराजाराम या दोन्ही ठिकाणच्या पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या हालचालींवर तो पाळत ठेवून होता, असे पोलिसांनी सांगितले.



कोण आहे नक्षलवादी महेंद्र वेलादी?


महेंद्र किष्टय्या वेलादी हा नक्षलवादी सन 2009 मध्ये माओवाद्यांच्या सप्लाय टीमचा सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली. माओवादी चेरपल्ली जंगल परिसरात आल्यानंतर तो त्यांची सेंत्री ड्युटी करायचा. तो सन 2010 पासून नॅशनल पार्क, बीजापूरच्या सॅण्ड्रा भागात सीपीआय (माओवादी) चा चेरपल्ली आरपीसीचा (रक्षा पार्टी कमीटी) सदस्य होता. त्यानंतर तो नॅशनल पार्क एरिया, बीजापूर येथील सॅण्ड्रा दलममध्ये सदस्य म्हणून काम करत होता. 


कार्यकाळात केलेले गुन्हे


महेंद्र वेलादी हा दोन चकमकींमध्ये सहभागी होता. डिसेंबर 2017 मध्ये मौजा सॅण्ड्रा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याने सहभाग घेतला होता. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये गडचिरोली आणि बीजापूर पोलिसांच्या संयुक्त पथकासोबत मौजा टेकामेट्टा जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तो सामील होता. वर्ष 2023 मध्ये मौजा कापेवंचा ते नैनेर जाणाऱ्या रोड जंगल परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण आणि त्यांचे वाहन जाळपोळीच्या गुन्ह्यात वेलादी सहभागी होता, त्याशिवाय, सॅण्ड्रा गावातील एक निपराध व्यक्तीच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. 


सरकारकडून दोन लाखांचे बक्षीस 


गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 72 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. सरकारकडून महेंद्रवर दोन लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.