गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील धानोरा तालुक्यातील बोधी टोलाजवळ झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या (Naxal) चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली (Gadchiroli) पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे या चकमकीत मोस्ट वाँटेड असलेला जहाल नक्षलवादी दुर्गेश वट्टी याचा देखील खात्मा करण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी जांभूळखेडा येथे स्फोट घडवून नक्षल्यांनी 15 पोलीस जवानांना ठार केले होते. या घटने मागे मुख्य सूत्रधार असलेल्या कसनसूर दलमचा उप-कमांडर दुर्गेश वट्टीची ओळख पटली आहे. या घटनेमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. या परीसरत पोलीस अधिक तपास करत असून नक्षलवाद्यांच्या तळाचा शोध गडचिरोली पोलीस (Gadchiroili Police) घेत आहे.
पोलीस-नक्षल्यांत एक तास गोळीबार
काही दिवसांपूर्वी सरकारने बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो याला सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली होती. माओवादी मेस्सो कवडो याच्यावर सरकारने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काही अंशी नक्षल कारवाईला पायबंद लागला होता. मात्र कायम धुमसत असलेल्या नक्षल प्रभावित क्षेत्रात नव नविन मनसुबे रचत असतात.
अशीच एक नक्षल्यांची मोठी तुकडी छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील गोडलवाही या शेवटच्या चौकीपासून 10 किलोमीटर अंतरावर बोधीटोलाजवळील सीमेवर तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही तुकडी पोलीस जवानांवर हल्ला करुन घातपात करण्याच्या तसेच निष्पाप आदिवासींना मारण्याच्या हेतूने व्यूहरचना आखत असल्याची कुणकुण गडचिरोली पोलिसांना लागली. या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या परिसरात शोधमोहीम राबविली.
नक्षलवाद्यांजवळ AK-47 सह मोठा घातक शस्त्रसाठा
मिळालेल्या माहितीच्या आधारे नक्षल्यांच्या तळाचा शोध घेत असतांना पोलीस आपल्या मागावर असल्याची बाब नक्षल्यांच्या लक्ष्यात आली. त्यानंतर नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यावर पोलिसांनीही चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीनंतर नक्षल्यांनी पळ ठोकला. त्यानंतर या परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबविले असता या ठिकाणी दोन नक्षल्यांचे मृतदेह आढळले. या नक्षलवाद्यांजवळ एके 47 सारख्या घातक शस्त्रासह एसएलआर बंदूक आढळून आली. या दोन मृत नक्षल्यांचे मृतदेह हेलिकॉप्टरने गडचिरोलीला आणून जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे रवाना करण्यात आले.
नक्षल्यांच्या रक्तपाताला पोलिसांचे चोख उत्तर
नुकताच 2 ते 8 डिसेंबर दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी पीएलजीए सप्ताह साजरा केला होता. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलिवरोधी अभियान गतिमान केले होते. या दरम्यान नक्षल्यांनी 15 नोव्हेंबरला भामरगड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, 23 नोव्हेंबरला टिटोळा (ता.एटापल्ली) येथे पोलीस पाटील लालसू वेडदा, 24 नोव्हेंबरला कापेवंचा (ता. अहेरी) येथे रामजी आत्राम तर 2 डिसेंबरला चमरा मडावी (रा. मुरकुटी ता. कोरची) याची हत्या करुन पोलिसांना आव्हान दिले होते. पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयाने या चौघांना संपविले होते. आताच्या कारवाईत पोलिसांनी दोन नक्षल्यांचा खात्मा करून नक्षल्यांच्या या हत्यासत्राला देखील चोख उत्तर दिले आहे.