Gadchiroli Triple Murder Case : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील भामरागाड तालुक्यातील अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त (Naxal) भागात असलेल्या गुंडापुरी गावातील तिहेरी हत्याकांडाचा (Gundapuri triple murder) अखेर सात दिवसांनंतर उलगडा झाला. गुंडापुरी गावातील बुर्गी (येमली) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगल व्याप्त शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत वृद्ध दाम्पत्यासह नातीची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला होता. घटनेचे गांभीर्य व तिव्रता लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी हा गुन्हा जलद गतीने उघड करण्याकरीता पथके नेमून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. अखेर या तिहेरी हत्याकांडाचा सात दिवसांनंतर उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन मुले, जावई आणि गावातील इतर सहाजणांनी मिळून ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
वृद्ध दाम्पत्यासह नातीची निघृनपणे हत्या
6 डिसेंबरच्या मध्यरात्री गुंडापुरी गावालगतच्या हद्दीतील जंगल व्याप्त शेतशिवारात असणाऱ्या झोपडीत वृद्ध दाम्पत्यासह नातीची निघृनपणे हत्या करण्यात आली. एकाच रात्री अज्ञात ईसमांनी तिघांची हत्या केल्याने संपुर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला होता. या थरारक घटनेमुळे समाजातील सर्वच स्तरातुन खेद व्यक्त करुन मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य व तिव्रता लक्षात घेवुन पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी हा गुन्हा जलद गतीने उघड करण्याकरीता तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी, बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी त्यांचे तपास पथकासह पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) येथे तळ ठोकून तपास सुरू केला. या तिहेरी निघृन हत्याकांडाचा लवकरात लवकर छडा लावुन आरोपींना जेरबंद करण्याबाबत पाच तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातील निगडीत सर्व बाबींचा सखोल तपास होण्याकरीता वेगवेगळी जबाबदारी प्रत्येक पथकावर देण्यात आली.
नक्षल सप्ताहात तिहेरी हत्याकांड
देवू हे गावात पुजारी म्हणून काम करत. यातूनच आजारी रुग्णही त्यांच्याकडे जात. त्यांनी काही रुग्णांना बरे केल्याची चर्चा पसरल्याने संख्या वाढली. पण, काही रुग्णांचा मृत्यूही झाला. जादूटोणा करून देवू हे बरे करण्याऐवजी बळी घेत असल्याचा संशय बळावला. काही लोक देवू यांची मुले रमेश व विनू यांना टोमणे मारत. शिवाय दहा वर्षांपूर्वी देवू यांचा जावई तानाजी कंगाली (रा. विसामुंडी, भामरागड) याची दोन वर्षांची मुलगी आजारी पडल्यानंतर उपचारासाठी घेऊन आला. पण तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे जावयाच्या मनातही सासर्याबद्दल राग होता. सहा महिन्यांपासून या तिघांसह गावातील लोकांनी देवू कुमोटी यांना संपविण्याचा कट रचला. 6 डिसेंबरला धान मळणीसाठी देवू, त्यांची पत्नी बिच्चे कुमोटी व नात (मुलगी) अर्चना तलांडी हे तिघे गुंडापुरी शिवारातील झोपडीत झोपले होते. नऊ जणांनी मिळून लोखंडी हातोडा व धारदार सुरीने सुरुवातीला देवू, नंतर बिच्चे व शेवटी अर्चनाचा गळा चिरून निर्दयीपणे संपविले. विनू कुमोटी याच्या फिर्यादीवरून बुर्गी (येमली) पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. नक्षल सप्ताहात तिहेरी हत्याकांड घडल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान होते.
अत्यंत शिताफीने 9 आरोपी केले जेरबंद
लोकांच्या आजारपणास देवु कुमोटी हाच कारणीभुत असल्याचे मानुन मृतकाचे मुले रमेश कुमोटी, विनु कुमोटी (फिर्यादी) तसेच त्याचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजु आत्राम (येमला), नागेश उर्फ गोलु येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी सर्व रा. गुंडापुरी, तसेच मृतकाचा जावई तानाजी कंगाली, रा. विसामुंडी, ता. भामरागड यांनी कट रचुन मृतक देवु कुमोटी याचे डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार करुन व मृतकाची पत्नी बिच्चे कुमोटी हिचा धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केली. घटनेच्या दिवशी मृतकाची नात कु. अर्चना तलांडी, रा. मरकल ही मृतकांसोबत असल्याने ती आपल्याला ओळखुन पोलीसांना माहीती देईल या भितीने आरोपींनी मागचा पुढचा विचार न करता तिचा देखील धारदार सुरीने गळा कापुन निघृन हत्या केल्याचे तपासा दरम्यान निष्पन्न झाले. त्यानंतर या नऊ आरोपींना पोलीसांना अत्यंत शिताफीने जेरबंद केले. या गंभीर व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्ह्यात पोलीसांनी अत्यंत संयमाने व सातत्याने तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन नऊ आरोपींना जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.