Gadchiroli News : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील सुरजागड लोह प्रकल्पाच्या (Surjagarh Mining Project) खाणीत मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पात रविवारी (6 ऑगस्ट) सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली. मृतकांमध्ये सोनल रामगीरवार (वय 26, नागेपल्ली ता. अहेरी) यांच्यासह हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. हरियाणातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडून लोह उत्खनन सुरु आहे. या पहाडीवरुन उत्खनन करणारे वाहन खाली कोसळलं, हे वाहन खाली उभ्या असलेल्या जीपवर आदळलं. तिथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केलं.


ट्रकच्या खाली चिरडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू


एटापल्ली तालुक्यात सुरजागड टेकडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरु आहे. इथे सुरु असलेल्या बेदरकार अवजड वाहतुकीमुळे लोकांचा नाहक बळी जात असल्याचंही समोर आलं आहे. 14 मे 2023 रोजी 12 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. ‎लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून‎ तिचा मृत्यू झाला. चामोर्शी तालुक्यातील आष्टी इथे वन विभागाच्या तपासणी नाक्यासमोर हा अपघात घडला. सोनाक्षी मसराम (वय 12 वर्षे, रा. नांदगाव‎ फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर) असं मृत मुलीचं नाव आहे.‎ ही मुलगी आपल्या मामासोबत दुचाकीने आलापल्ली- चंद्रपूर मार्गावरील आष्टीवरुन‎ गोंडपिपरीकडे जात होती. वन विभागाच्या तपासणी‎ नाक्यासमोर दुचाकी घसरल्याने सोनाक्षी आणि तिचा मामा‎ खाली पडले. एवढ्यात मागून बल्लारशाकडे लोहखनिज‎ घेऊन जाणाऱ्या बेदरकार ट्रकच्या चाकाखाली आल्याने‎ सोनाक्षीचा जागीच मृत्यू झाला.‎


सुरजागड टेकडीवर लोहखनिजाचे साठे


गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज साठे आहेत. अनेक वर्षे पुरेल इतका लोहखनिज साठा इथे आहेत.  घनदाट जंगलाचा हा भाग असल्याने पर्यावरणवादी आणि काही स्थानिकांचा इथे उत्खनन करण्यास विरोध आहे. सोबतच नक्षलवाद्यांनी देखील प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. मागील काही वर्षांत राज्य सरकारने खासगी कंपन्यांना उत्खननाची परवानगी दिली होती. परंतु स्थानिकांचा आणि नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर 2022 मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढून हा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पापासून सरकारने 450 कोटींचा महसूल मिळाल्याचा दावा सरकारकडून केला जातो.