Gadchiroli News : सरकारी काम बारा महिने थांब ही म्हण काही नवीन नाही. सरकारी कार्यालयात आपली कामे वेळेत होत नाहीत याचा अनेकदा तुम्हाला अनुभव आला असेल. मात्र, असा प्रकार गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अहेरी उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चांगलाच भोवला आहे. या कार्यालयात निष्काळजीपना, दफ्तरदिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची वेळ आली आहे. 


उपविभागीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना केलं निलंबित


गडचिरोली जिल्हा हा आदिवासी अतिदुर्गम आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुर्गम भागातून अनेक लोक सरकारी कामासाठी कार्यालयात येत असतात. मात्र, त्यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. अहेरी उपविभाग कार्यालयात मागील काही वर्षांपासून परिसरातील नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळं कार्यालयीन कामासाठी हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळं अनेक कामं खोळंबली होती. महिनाभरापूर्वी वैभव वाघमारे हे उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू होताच कार्यालयाला शिस्त लावण्याच्या बराच प्रयत्न केला. परंतू, कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळं उपविभागीय अधिकारी वाघमारे यांनी सोमवारी स्वतःच्याच कार्यालयाला कुलूप ठोकून शिपाई आणि नायब तहसीलदार यांना वगळून इतर सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. शिपाई आणि नायब तहसीलदार हे वेळेत उपस्थित असल्यामुळं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.


अचानक केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळं गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


दरम्यान, अचानक केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळं गडचिरोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमधून उपविभागीय अधिकारी वाघमारे यांचे कौतुक करण्यात येत आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांन निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे, पण याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. दफ्तरदिरंगाई, निष्काळजीपणा आणि अकार्यक्षमतेमुळं कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलं. या कारवाईमुळं कर्मचाऱ्यांना भीती राहील. तसेच कामात शिस्त लागेल. लोकांची कामं वेळेत होतील असेही ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याला अटक , पैशाच्या व्यवहारातून हत्या