वर्धा : सोशल मीडियाचा वापर इंन्स्टट अपडेट्स मिळवण्यासोबतच शेतमाल विक्रीसाठीही करता येतो, हे सर्वांनाच माहिती आहे. पण याच्या योग्य वापर करुन फळांच्या हायटेक विक्रीतून हिंगणघाटचे रतन बोरकरे लाखोंचा नफा कमावत आहेत.

रतन बोरकर यांची हिंगणघाटमध्ये सात एकर शेती आहे. या सात एकरापैकी प्रत्येकी एक एकरात त्यांनी आंबा, लिंबू आणि सिताफळाची तर उर्वरीत क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली. सध्या त्यांना सिताफळांचं उत्पादन चांगलं मिळाली असून, त्यांच्या विक्रीसाठी मार्केट ऐवजी त्यांनी चक्क व्हॉट्सअॅपचा आधार घेतला. आणि त्याचा त्यांना चांगलाच फायदा होत आहे.

बोरकरे यांनी एक एकर क्षेत्रात सिताफळाच्या 327 रोपांची त्यांनी लागवड केली होती. यासाठी त्यांनी झिरो बजेट शेती तंत्राचा त्यांनी वापर केला. आठ बाय 13 अशा अंतरावर त्यांनी रोपांची लागवड करुन, लागवडीसाठी सरस्वती नऊ या वाणाची निवड केली.

सध्या 327 पैकी 160 झाडांपासून बोरकर यांना चांगलं उत्पादन मिळतं आहे. त्यांनी 175 रुपये किलो या दरानं ते सिताफळांची विक्री करतात. यातून त्यांना 1 लाख 75 हजारांचं उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

खर्च वजा जाता बोरकर यांना सरासरी 1 लाख 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे. संपुर्णपणे सेंद्रीय पद्धतीनं शेतीचं नियोजन केल्यानं खर्चात घट झाल्याचं बोरकर सांगतात.

झिरो बजेट शेती तंत्राचा वापर केल्यानं विषमुक्त फलोत्पादन घेण्यात बोरकर यांना यश मिळत आहे. या सेंद्रीय पद्धतीमुळे फळांचं दर्जेदार उत्पादनही त्यांना मिळत आहे. उत्तम दर्जाचे सिताफळ घरपोच मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणात ग्राहक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.

बोरकर यांना या सिताफळाच्या झाडांपासून आणखी 30 ते 40 वर्ष उत्पादन मिळणार आहे. दरवर्षी मिळणाऱ्या नफ्यातही वाढ होत जाणार आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढी सोबतच शेतमालाच्या विक्रीचंही नियोजन करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सोशल मीडिया एक उत्तम माध्यम सिद्ध होऊ शकतं, आणि हेच रतन बोरकर यांनी दाखवून दिलं.