शौचालय उद्घाटनादरम्यान अनिल परबांसमोर तक्रारीचा पाढा
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 10:24 AM (IST)
महापालिका आमची घरं पाडत असताना शौचालय कशाला हवं, असा सवाल यावेळी स्थानिकांनी विचारला.
मुंबई: शिवसेना आमदार अनिल परब हे शौचालयाच्या उद्घाटनासाठी गेले असता, त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. महापालिका आमची घरं पाडत असताना शौचालय कशाला हवं, असा सवाल यावेळी स्थानिकांनी विचारला. खारमध्ये ही घटना घडली. महापालिका निवडणुकीवेळी स्थानिकांनी शौचालयाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी आमदार अनिल परब यांनी शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सध्या खार परिसरात महापालिकेकडून कारवाई सुरु आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी शौचालय नको, घरं वाचवा अशी याचना आमदारांकडे केली. मी स्थानिकांच्या बाजूने दरम्यान, याप्रकरणी एबीपी माझाने अनिल परब यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांनी आपण स्थानिकांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. तसंच याप्रकरणी वेळोवेळी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधत असून, स्थानिकांना नक्कीच दिलासा देऊ, असं परब म्हणाले.