नांदेड : गरज नसेल तर कर्जमाफी घेऊ नका, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर नांदेडमधील एका शेतकऱ्यांनी त्याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या भास्करराव जहागीरदार यांनी कर्जमाफी नाकारुन आपल्यावरील कर्जाची परतफेड केली आहे.


जहागीरदार यांच्याकडे सव्वा दोन एकर जमीन आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून 20 हजारांचं कर्ज घेतलं होतं. पण निसर्ग कोपला, सोयाबीनचं उत्पन्न मिळालं नाही. त्यामुळे पीक विम्यातून त्यांना 20 हजारांची नुकसान भरपाई मिळाली. आता कर्जमाफीचाही त्यांना लाभ होणार असताना, त्यांनी याला नकार दिला आहे.

वास्तविक, भास्करराव जहागीरदार हे स्वतः सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांना महिन्याकाठी 18 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते. त्यांची तिन्ही मुलं कमावते आहेत. आर्थिक स्थिती चांगली, शिवाय भरघोस पीक विमाही मिळाला. अशा परिस्थितीत कर्जमाफी पदरात पाडून घेणे त्यांना रुचत नाही.

त्यामुळे सरकारने केवळ गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी. आणि खरोखर ज्यांची स्थिती खराब नाही किंवा जे संपूर्णपणे शेतीवर अवलंबून नाही, त्यांनी कर्जमाफी फेटाळावी, असं आवाहन जहागीरदार यांनी केलं आहे.

पंतप्रधानांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या सधन असलेल्या लोकांनी गॅसची सबसिडी नाकारण्याचे आवाहन केले. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सधन शेतकऱ्यांनी कर्जमाफी टाळावी असे आवाहन केले होते. त्याला भास्करराव जहागीरदार यांच्यासारख्या शेतकर्‍यांनी प्रतिसाद देत, कर्जमाफी नाकारुन नवा आदर्श घालून दिला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्याला कर्जमाफीतून वगळण्याची विनंती केली आहे. राहुल कुल यांच्यावर 20 लाखाचं कर्ज आहे. मात्र आपलं कुटुंब ते कर्ज फेडण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे आपणास कर्जमाफीतून वगळण्यात यावं असं कुल यांनी पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

कर्जमाफीतून वगळा, रासप आमदार राहुल कुल यांचं पत्र