फार गुंतागुंतीचं कथानक न घेता एक तुलनेनं नेटकं कथानक घेऊन त्यातले डाव रंगवण्याचा घाट दिग्दर्शकाने घातला आहे. ही गोष्ट आहे आंबेगावात घडणारी. आंबेगावात आण्णा उभे यांची सत्ता चालते. ते या गावचे वर्षानुवर्षे सरपंच होते. आता त्यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यामुळे गावात पुन्हा सरपंचाची निवडणूक लागली आहे. आण्णांच्या जागी त्यांचा मोठा मुलगा नवनाथ उभा राहणार हे गृहित आहे. त्याला तगडी टक्कर देणार आहे गावातले गाडवे यांचं पॅनल. ही लढत होणार असं वाटत असतानाच स्थानिक आमदारांना मात्र आण्णा उभे यांच्या पत्नीने सरपंच व्हावं असं वाटतं. बचत गटाकरवी त्यांचाही संपर्क दांडगा आहे. हा या तीन फळ्यांमध्ये सरपंच पद नेमकं कुणाच्या गळ्यात पडतं.. त्यात डाव, प्रतिडाव कसे मांडले जातात.. याचा हा सिनेमा बनला आहे. अर्थात फक्त राजकीय खेळीचा हा सिनेमा नाही. एकाच घरात पडलेली उभी फूट हेरतानाच राजकारणाचा माणसांवर होणारा परिणामही इथे साधलेला आहे.
उत्तम संवाद.. नेमकी पटकथा यांमुळे हा सिनेमा कंटाळवाणा होत नाही. सुरूवातीला अनपेक्षितपणे येत जाणारी वळणं त्यातून माणसामाणसांतले बदल जाणारी नाती यात अधोरेखित होतात. चालू असलेल्या राजकारणात प्रत्येकजण आपआपली पोळी कशी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय तेही यात दिसतं. याल संवादांची जोड आहे. यात सई ताम्हणकरची सभा तर अफलातून आहे. घे शिक्षण घे.. पाणी घे.. योजना घे.. घे गं माय.. हे जबरा आहे. त्याचवेळी बायका राजकारणात उभ्या जरी राहिल्या तरी सत्ता पुरूषच चालवतो हा संवादही कमाल आहे. आवर्जून उल्लेख करायला हवा तो प्राजक्त हणमघर या अभिनेत्रीचा. गाडवे आपल्या पत्नीला राजकारणाबद्दल विचारू लागतात तेव्हा ओटा आणि गोठा.. या आशयाचा संवाद टाळ्या वसूल आहेच पण त्याचवेळी विचारमग्न करणारा आहे. अंकुश, अमेय, सई, सोनाली, सिद्धार्थ, अलका कुबल या सर्वांची कामं निव्वळ देखणी आहेत. यात प्रियदर्शन जाधव, उमेश कामतही मंडळीही मध्ये येऊन रंगत वाढवतात. कलाकाराचे डोळे टिपण्याचा इथे झालेला प्रयत्न मजा आणतो. संपूर्ण पटकथेत राहता राहता वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या अशा, पूर्वार्धात हनुमंताच्या व्यक्तिरेखेची जरा जास्तच चेष्टा झाल्याची वाटते. उत्तरार्धात हाच हनुमंत कमाल इंटेन्स वाटतो. तुलनेनं सुरूवातील सौ व श्री हनुमंत यांचे सुरूवातीचे संवाद संथ वाटतात. त्याचवेळी पूर्वार्धात वेळोवेळी येणारे आमदार नंतर सत्तानाट्य रंगल्यानंतरही हवे होते म्हणजे त्यांचं अस्तित्व अचानक कसं काय गायब झालं असं वाटून जातं. शिवाय, ऐन वाढदिवशी हनुमंताचा झालेला राडाही जरा कृत्रिम वाटून जातं.. पण राजकारण माणसाला आंधळं करतं असं म्हणून त्या विचाराला शह बसू शकतो. लेखन आणि अभिनयासह पार्श्वसंगीतात तालवाद्याचा वापर ताण निर्माण करतो, जे आवश्यकही आहे. छायाचित्रण, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट अपेक्षा पूर्ण करतो.
तर असा हा धुरळा. इतके सगळे तगडे कलाकार घेऊन दिग्दर्शकाने त्यांची मोट बांधली आहे. खूप छोट्या छोट्या भूमिकेत कलाकार भाव घाऊन गेले आहे. प्राजक्ताचं उदाहरण वर दिलंच. तसंच सुनील तावडे, उदय सबनीस, श्रीकांत यादव आदींचं आहे. सिनेमा बघताना मजा येते. काहीतरी चांगंलं बघितल्याचा फील येतो. सिनेमाचा शेवटही तितकाच महत्वाचा. अर्थात ते सूचकही आहे. राजकारणाच्या गढूळ खेळामुळे नव्या पिढीसमोर आपण काय वाढून ठेवतो आहोत याचाही एक कोन हा सिनेमा देऊन जातो.
पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत साडेतीन स्टार्स. मोठ्या कलाकारांचा मोठा सिनेमा आता थिएटरवर धडकला आहे. मराठी रसिकांनी हा सिनेमा आवर्जून पाहायला हवा हे नक्की.