बीड : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीतून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माघार घेतली आहे. राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही आहे. त्यामुळे लोकशाहीची प्रक्रीया म्हणून ही निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. राज्यातील सत्तास्थापनेनंतर महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही आघाडी करत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्न करत आहे. पंकजा यांच्या या ट्विटमुळे आता कोल्हापूर, नाशिकनंतर आता बीड जिल्हा परिषद देखील भाजपच्या ताब्यातून जाणार आहे.


राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. काल एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचं मनोमिलन झालं. त्याच्याच जोरावर खडसे आणि महाजन यांनी जळगाव जिल्हा परिषदेचा गड राखला. त्यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीआधीच पराभव मान्य करत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं मैदान सोडलं आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याची घोषणा केली आहे.

"राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे, रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे, बाकी निकाल स्पष्टच आहेत" असे ट्विट पंकजा यांनी केलं आहे. मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे बहुमत असताना बंडखोरीचा त्यांना फटका बसला आणि शिवसेनेच्या जोरावर भाजपने सत्ता मिळवली.
सत्ता आमचीच येणार - मंत्री धनंजय मुंडे
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस मिळून आम्ही बहुमताच्या पलीकडे पाहचलो आहे. त्यामुळे आता विजयाची औपचारिकता बाकी असल्याचं कॅबीनेट मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. मागच्या वेळेस राष्ट्रवादीचे बहुमत असताना बंडखोरी केल्याने आमची सत्ता गेली होती. यावेळी परत आम्ही ती मिळवत आहोत.

बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल -
भाजप - 17
राष्ट्रवादी - 23
अपक्ष-निंबाळकर 1
शिवसंग्राम 4
शिवसेना 4
काँग्रेस 2
मुंदडा गट 1
रामदास बडे 1
पोटनिवडणूक - 2
अपात्र सदस्य - 5
एकूण - 60

महाविकासआघाडीची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरशी -
राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर आता महाराष्ट्र विकास आघाडी स्थानिक संस्थामध्येही आघाडी करताना दिसत आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपध्याक्ष पदासाठी निवडणुका सुरू आहे. कोल्हापूर, नाशिक आणि आता औरंगाबादमध्ये आघाडीतील पक्षांची सत्ता आली आहे. या सर्वच ठिकाणी भाजपची सत्ता होती. काल जळगावमध्ये खडेस-महाजन यांनी आपला गड राखला. तर, आज पंकजा मुंडे यांनी माघार घेतल्याने बीड जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून निसटणार आहे.

संबंधित बातमी -

अब्दुल सत्तार नाराज नाहीत; उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार, अर्जुन खोतकरांची माहिती

Beed | बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का? | ABP Majha