धुळे : एकेकाळी धुळे (Dhule) जिल्हा हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपने (BJP) हा जिल्हा काबीज केला. तर 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएम (MIM) पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले. धुळ्यात एकूण पाच मतदारसंघात समावेश होतो. त्यात काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि एमआयएम या सर्वच पक्षांचा वरचष्मा पाहायला मिळतो. धुळे जिल्ह्यात लोकसभेत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र या निवडणुकीचा धडा घेत भाजपने विधानसभा निवडणुकीत धुळ्यातील मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार? एमआयएमसारख्या पक्षाला पुन्हा एकदा धुळ्यातून आमदार निवडून आणता येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुळे जिल्ह्यात कुणाचे प्राबल्य?
धुळे जिल्हा विधानसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा शिरपूर आणि साक्री यांचा समावेश होतो. पाचही विधानसभा मतदारसंघात शिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी भाजपाची तर साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते तर धुळे ग्रामीणमधून काँग्रेसने आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमने विजय प्राप्त केला होता. धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत चुरशीची झाली होती. येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? हे आता काळच ठरवणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील विधानसभा मतदारसंघांची राजकीय स्थिती नेमकी कशी आहे? याबाबत जाणून घेऊयात.
धुळे जिल्ह्यातील आमदारांची यादी
1) साक्री विधानसभा- मंजुळा गावित (अपक्ष) (Manjusha Gavit)
2) धुळे ग्रामीण विधानसभा - कुणाल पाटील (काँग्रेस) (Kunal Patil)
3) धुळे शहर विधानसभा - फारुक शाह (MIM) (Faruk Shah)
4) सिंदखेडा विधानसभा - जयकुमार रावल (भाजप) (Jaykumar Raval)
5) शिरपूर विधानसभा - काशिराम पावरा (भाजप) (Kashiram Pawara)
विधानसभानिहाय 2019 मधील लढती आणि मताधिक्य
1. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हिलाल माळी, आणि अनिल गोटे यांच्यात मुख्य लढत झाली होती मात्र धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे डॉक्टर फारुक शहा हे विजयी झाले होते. फारुक शाह यांनी 3 हजार 307 मतांच्या फरकाने विजय मिळवत या विधानसभा मतदारसंघात गुलाल उधळला.
2. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांच्यात लढत झाली होती. या ठिकाणी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय झाला होता. कुणाल पाटील यांनी ज्ञानज्योती पाटील यांचा 14 हजार 564 मतांनी पराभव करून जागा जिंकली.
3. सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे जयकुमार रावल आणि राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांच्यात लढत झाली होती. यात जयकुमार रावल यांचा विजय झाला होता. जयकुमार रावल यांनी संदीप बेडसे यांचा 42 हजार 915 मतांनी पराभव केला होता.
4. साक्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे धनाजी अहिरे यांच्यात मुख्य लढत झाली होती या ठिकाणी अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांचा विजय झाला होता. मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला.
5. शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे काशीराम पावरा, काँग्रेसचे रणजीत पावरा आणि अपक्ष डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यात लढत झाली होती. याठिकाणी भाजपाचे काशीराम पावरा यांचा विजय झाला होता. काशीराम वेचन पावरा यांनी 49 हजार 174 मतांनी पराभव करून जागा जिंकली.
मूलभूत सोयी सुविधांच्या मुद्द्यांवर निवडणूक
धुळे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दोन जागा काँग्रेसला एक एमआयएमला एक आणि अपक्ष एक असे विजयी झाले होते.विधानसभा निवडणुक ही रोजगारासह मूलभूत सोयी सुविधांच्या मुद्द्यांवर लढवण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या विजयी झाल्या आहेत यामुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत बघायला मिळणार आहे. जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला मिळणार? यावर विधानसभेची राजकीय समीकरण ही ठरणार आहेत. धुळे शहर विधानसभा मतदारसंघावर महायुतीकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिघेही दावा करीत आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही जागा मागणार असून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघावर विविध पक्षांकडून दावे केले जात आहेत.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
धुळे जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. यामुळे शिंदखेडा, साक्री आणि धुळे ग्रामीण या तीन मतदारसंघात शेतकऱ्यांची मते ही मोठ्या प्रमाणावर निर्णायक ठरत असतात. तर दुसरीकडे धुळे शहर विधानसभा मतदारसंघात रोजगाराच्या मुद्द्यावरून तसेच मूलभूत सोयी सुविधांच्या मुद्द्यांवरून ही निवडणूक चर्चेची होत असते. 2019 च्या निवडणुकीत एमआयएमला मिळालेला विजय ही इतिहासात प्रथमच घडले असून यामुळे भाजपासह अन्य पक्ष देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील.
आणखी वाचा
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी