Dhule News : धुळे (Dhule) जिल्ह्याची मुख्य नदी म्हणून पांझरा नदीची (Panzara River) संपूर्ण राज्यात ओळख आहे. या जिल्ह्याचा 80 टक्के भूभाग हा पांझरा नदीच्या उपखोऱ्यामध्ये आहे. जिल्ह्यातील तीन तालुके नदीच्या पाणलोट क्षेत्रावर वसले असून, हे तीन तालुके पांझरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील 518 खेड्यांपैकी जवळपास 421 खेडी ही दरवर्षी दुष्काळग्रस्त असतात. मात्र, जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ही ओळखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत. दुष्काळग्रस्त ओळख पुसणारी पांझरा बारमाही योजना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने रखडल्याचे बोलले जात आहे.
250 कोटी रुपये मंजूर आणि वितरित झाला मात्र...
2004-05 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय समविकास योजनेअंतर्गत पांझरा बारमाही योजना अस्तित्वात आणली होती. त्यासाठी जवळपास 856 कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. पांझरा नदी वाहती रहावी यासाठी ही योजना पाच टप्प्यांमध्ये अंमलात येणार होती. माथा ते पायथा या सिंचनाच्या तत्त्वानुसार ही योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नदीच्या उगमापासून मृदा संधारण जलसंधारण आणि वन संधारण या अंतर्गत सूक्ष्म जलसंधारण करून ही योजना कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार नदीच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून बंधारे उभारण्यात येणार होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 856 कोटींपैकी 250 कोटी रुपये मंजूर आणि वितरित देखील झाले. मात्र, तात्कालीन लोकप्रतिनिधींनी तो निधी अन्यत्र वळवला आणि ही योजना मात्र पूर्णतः बारंगळली. लोकप्रतिनिधींच्या आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे धुळे जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ही योजना अद्यापही कार्यान्वित करण्याचा विचार पुढे आलेला नाही.
पांझरा नदीच्या पात्रावर वसलेले तीनही तालुके दरवर्षी दुष्काळग्रस्त
गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात दरवर्षी पांझरा नदी काही प्रमाणात वाहते. साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जातो. यामुळं काही महिने ही नदी वाहती असते. मात्र, त्यानंतर नदीचे पाणी वाहून जाते. हे वाहून गेलेले पाणी तापी नदीला जाऊन मिळते. 136 किलोमीटरचा प्रवास करुन पांझरा नदी तापी नदीला जाऊन मिळते. साक्री तालुक्यातील शेंदवाडच्या डोंगरातून पांझरा नदीचा उगम होतो तर शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथे पांझरा नदी तापी नदीला जाऊन मिळते. तापी नदीतून पांझरा नदी पात्रातील पाणी काही काळ अडवलं जातं. मात्र, बॅरेजेसमधून शेतीला पाणी पुरवण्यासाठी राबविली जाणारी उपसा जलसिंचन योजना अद्याप कार्यान्वित झालेली नाही. यामुळं काही कालावधीनंतर हे पाणी तापी नदीच्या पात्रात सोडले जाते. यानंतर हे पाणी वाहत जाऊन जिल्ह्यातील इतर नद्यांना मिळतं. तिथून पुढे तापी नदीतील पाणी गुजरातमधील उकाई धरणात जाऊन मिळते. यामुळं पांझरा नदीच्या पात्रावर वसलेले तीनही तालुके दरवर्षी दुष्काळग्रस्त राहतात. तापी नदीच्या 191 पैकी 181 टीएमसी पाणी उकाई धरणात जातं. यामुळं धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी गुजरातला जात तिथे त्यांची समृद्धी होते. यामुळं धुळे जिल्ह्याच्या वाटेला आलेला पाणी वापरलं जात नाही, अडवलं जात नाही यासारखे धुळे जिल्ह्याचं कुठलंही दुर्दैव नाही.
महत्वाच्या बातम्या: