Dhule Shirpur : शिरपूर (Shirpur) तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या 14 पाड्यांवरील जिल्हा परिषद शाळांना (ZP School) हक्काची जागा आणि इमारत नसल्याने या शाळा झोपड्यांमध्ये भरत असल्याबाबतचे वृत्त एबीपी माझाने (ABP Majha) प्रसारित केल्यानंतर, या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाने या शाळांना हक्काची जागा आणि इमारत उपलब्ध करुन देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भात सर्व चौदा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येऊन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 


धुळे जिल्ह्यातील (Dhule) शिरपूर तालुक्यातील अनेर अभयारण्य क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या तब्बल 14 शाळा झोपडीत भरत असून यामुळे या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे या भागात जाण्यासाठी रस्त्यांची सोय नसल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेत पोहोचायचे तरी कसे? असा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात आहे. तसेच पावसाळ्यात (Rainy Season) या झोपड्या गळत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार घेऊन शाळेत बसावे लागते. एकीकडे सर्व शिक्षण अभियान शासनामार्फत राबवले जात असताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क त्याला मिळावा, यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च केले जातात. मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आजही या शाळांची दूरवस्था पाहता सर्व शिक्षण अभियान फक्त नावालाच राबवले जाते का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 


या शाळांची वस्तुस्थिती एबीपी माझाने मांडल्यानंतर याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गांभीर्याने दाखल घेत या सर्व चौदा शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येऊन त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिरपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. या शाळांच्या बांधकामासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरु असून देखील कुठलाही ठोस निर्णय झालेला नव्हता. सातपुड्याच्या पायथ्याशी वन जमिनीवर बांधकाम करण्यापूर्वी वनविभागाची परवानगी घ्यावी लागते, मात्र याबाबत शिक्षण विभागाने वारंवार प्रस्ताव सादर करुन देखील वनविभागाकडून परवानगी न देण्यात आल्याने या शाळांच्या इमारती बांधकामासाठी जागा उपलब्ध होऊ शकलेली नाही. अखेर या झोपडीत भरणाऱ्या 14 जिल्हा परिषद शाळांना आता इमारत मिळणार असून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षितरित्या पूर्ण होणार आहे.


14 आदिवासी पाड्यांवर समस्या 


शिरपूरपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर हे आदिवासी पाडे (Trible Area) आहेत. वन्यजीवांच्या नावाखाली विविध शासकीय योजनांना तिलांजली देऊन येथे शाबूत मनुष्य प्राण्याला न्याय मिळत नाही. सोहज्यापाडा, चिंचपाणीपाडा, भिवखेडापाडा, तेल्यादेवपाडा, सातपाणीपाडा, जमाईपाडा, कांज्यापाडा, जामनपाणीपाडा, जुनापाणीपाडा या आदिवासी पाड्यांमध्ये विकासाची गंगाच अद्याप पोहोचलेली नाही. या आदिवासी पाड्यांमध्ये जायचे असेल तर रस्त्याचीच सोय नाही. आहे ते रस्ते अत्यंत दयनीय अवस्थेत असून या मार्गावरुन वाहन चालवणे, हे मोठ्याच जिकिरीचे काम आहे. मात्र रोजगार दूर, पाणी, वीज, रस्ते या मूलभूत प्रश्नांकडेही लक्ष देण्यात आले नाही.          


इतर संबंधित बातम्या : 


Dhule Shirpur : शिक्षणाची दैना! सर्व शिक्षण अभियान कुठंय? धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चौदा शाळा झोपडीत भरतात!