Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून (Dhule City Assembly Constituency) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मिळण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या मागणीला पक्षाकडून दुजोरा देखील दिला गेला असून शिवसेनेकडून निवडणूक लढविण्याची इच्छा पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
यातच युवा सेनेचे राज्य सहसचिव असलेले अॅड. पंकज गोरे (Pankaj Gore) यांनी नुकतीच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची भेट घेतली असून तेदेखील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पंकज गोरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे गेल्या पाच वर्षातील आपल्या कार्याचा अहवाल देखील सुपूर्द केला असून अॅड. पंकज गोरे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्याकडे सिद्धिविनायक ट्रस्टची देखील जबाबदारी देण्यात आली होती. शहरातून युवा नेतृत्वाला संधी मिळावी अशी मागणी अॅड. पंकज गोरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
धुळे शहर विधानसभेची जागा नक्की कुणाला?
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपांचा प्रश्न पूर्णतः निकाली निघणार आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघाची जागा जाणार? हे आता जवळपास निश्चित होऊ लागले आहे. यामुळे इच्छुकांची धाकधूक देखील वाढू लागली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पंकज गोरे धुळे शहर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक
दोन्ही पक्षांकडून शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. मात्र असं असताना दोन्ही पक्षातील इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे. ठाकरे गटातून युवा सेनेचे राज्य सहसचिव अॅड. पंकज गोरे धुळे शहर विधानसभेच्या मतदारसंघातून प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, दुसरीकडे अद्यापही पक्षाकडून जागेच्या संदर्भात आणि उमेदवारीच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही.
आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
पंकज गोरे हे 2009 सालापासून पक्षात कार्यरत असून सिद्धिविनायक ट्रस्ट येथे ट्रस्टी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाकडून त्यांची युवा सेनेच्या राज्य सहसचिव पदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपण 2009 पासून शासन दरबारी मांडण्यात आले असून हे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे काम आपण केले आहे. यासोबतच कोणतेही संविधानिक पद नसताना जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी अॅड. पंकज गोरे यांनी आणला आहे. यामुळे शहराच्या विधानसभेसाठी आपला पक्षाने जरूर विचार करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तसेच नुकतीच त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आणखी वाचा