धुळे : धुळे (Dhule News)  जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कोकणा कोकणी समाजाच्या डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू पाहायला मिळतात. नवसपूर्ती करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवानिमित्त आदिवासी बांधव एकत्र जमून मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करत असतात 


या उत्सवाच्या वेळी सर्वप्रथम गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच महिलांच्या हातून देवतांडा उभा केला जातो. या जागेवर मुळासकट उपटून आणलेले झेंडूचे रोपटे लावतात. या देवतांडाजवळ मोराच्या पिसांचा गुच्छ, काकडी, नागलीचे दाणे, उडदाचे दाणे ठेऊन दिवा ठेवला जातो. कार्यक्रमाच्या ठरविलेल्या मुदतीप्रमाणे पाच, सहा दिवस या थोम्बाजवळ महिला फेर धरून नाचतात. या उत्सवादरम्यान उपवास करून नियम पाळावे लागतात. आदिवासी महिला सकाळी अनवाणी फिरून शेजारील गावा गावामध्ये जातात. गाणे म्हणून फेर धरून पावरीवर नृत्य करतात. घरोघरी जाऊन धान्य जमा करतात.


 आदिवासी कोकणी कोकणा समाजाच्या गावात व डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम सुरु असताना. गावातील लोकांचे नवसपूर्ती झालेल्या कुटुंबातील कर्तापुरुष डोंगऱ्यादेव पूजाविधी मांडतात. या कार्यक्रमात  गाव मंडळीसह शेवऱ्यामाऊली तसेच शितमाऊलीच्या साहाय्याने देवखळीत पावरीच्या मधुर सुरांवर पायांचा ठेका धरून हाताने टाळ्यांच्या गजरासह निसर्गदेवतेची गौरवगाथा, गाणी/वळती गायीली जातात. 


डोंगऱ्यादेवाला  नवस फेडण्यासाठी गर्दी


आदिवासी भागात डोंगऱ्यादेवाचा कार्यक्रम कार्तिक किंवा मार्गशीर्ष महिन्यात चंद्रदर्शनानंतर साजरा केला जातो. निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाला बोललेले नवस फेडण्यासाठी नवसपूर्ती किंवा डोंगऱ्यादेवाच्या कृपेने वैभव प्राप्त झालेले कुटुंब डोंगऱ्यादेवाची पूजा शेवऱ्यामाऊली(पुजारी) च्या मंत्रोच्चाराने भोपामाऊली(देवाचा सेवक), डवरीमाऊली(पावरकर) आणि गावकरी मंडळींच्या साक्षीने मांडत असतात. घरधनी माऊली आपल्या घराचे अंगण गोमूत्र व शेणाने सारवतात. त्या देवखळीवर(अंगणात) दररोज रात्री माऊल्या डोंगऱ्यादेवाच्या वळत्यां(गाण्यां) मध्ये विविध आदिवासी देवतांचे वर्णन, गौरव गात फेर धरून एका तालासुरात नाचत असतात. वळतीची प्रत्येक ओळ बदलली की नाचाचा प्रकारसुद्धा बदलत असतो. या उत्सवात गावात आनंदाला उधाण आलेले असते


डोंगऱ्या देवाच्या जागरणाचा कार्यक्रम साधारणतः चंंद्रदर्शन ते पौर्णिमेपर्यंत सुरु असतो. यात प्रमुख्याने सहाव्या दिवशी गडावर जाऊन देवाची पुजा मांडली जाते. या दिवशी रात्री सर्व आदिवासी महिला निसर्गच्या सानिध्यात राहून निसर्गदेवता डोंगऱ्यादेवाचा जागरण करीत असतात. पौर्णिमेला सुरूवात झाल्यावर डोंगरच्या कडा-कपारीत देवाची पुजा मांडून दिवा लावून या निसर्गदेवतेला आव्हान करून निसर्गाने आम्हाला साथ द्यवी. या जीवसृष्टीतील चिडी-मुंगी, पशु-पक्षी व मानवलोकांचे कल्याण व्हावे अशी विनवणी करून शेवऱ्या माऊली प्रार्थना करीत असते. निसर्गाला व मानवाला देवाच्या रूपात पाहण्याची आदिवासी विशेषतः कोकणी/कोकणा जमातीची ही संस्कृती आहे.