धुळे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पिके सडण्याचा धोका वाढला आहे, मात्र अद्यापही शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


धुळे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला असून साक्री तालुक्यात  सर्वाधिक पावसाने हजेरी लावली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात आणि शिरपूर तालुक्यात पावसाची अत्यंत कमी हजेरी लागली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा चिमठाणे तर शिरपूर तालुक्यातील जवखेडा होळनाथे मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके करपू लागली आहेत. साक्री तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने शेतात पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडण्याचा धोका वाढला आहे. 


धुळे जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 16 मंडळात 100 टक्क्यांपेक्षा अधिक साक्री तालुक्यात दोन मंडळात 200 टक्क्यांपेक्षा जास्त तर पाच मंडळात 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यात जवळपास 418 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून शेतात पाणी शिरल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरी आदी पिके सडण्याचा धोका वाढला आहे. दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या शिंदखेडा तालुक्यात फक्त 75 टक्के पाऊस झाला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिके सडू लागली असून शासनाकडून अद्यापही पंचनामे सुरू करण्यात आलेले नाही. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढला असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 


जिल्ह्यात मंडळ निहाय झालेला पाऊस
जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस जवखेडा मंडळात झाला असून फक्त 52 टक्के इतका पाऊस झाला आहे. नरडाणा 54.7 टक्के, होळनाथे 63.5 टक्के, चिमठाणे 67.7 टक्के, सोनगीर 69.8 टक्के, वर्षी 70 टक्के, खलाणे 71.5 टक्के, उमरपाटा 251.8 टक्के, कुणाशी 214.8 टक्के, ब्राह्मणवेल 194.8 टक्के, दहिवेल 175.7 टक्के, कासारे 188.7 टक्के, साक्री 158.7 टक्के, पिंपळनेर 157.2 टक्के, म्हसदी 138.5 टक्के, धुळे 199.8 टक्के, आर्वी 125.1 टक्के, फागणे 119.8 टक्के तर मूकटी 129.1 टक्के.