धुळे: सध्या सुरू असलेलं राजकारण पाहतो राजकारण्यांकडून काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती राहिली नाही अशी खंत मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे (Aruna Dhere) यांनी व्यक्त केली. कलेच्या माध्यमातून इतिहासाची मांडणी ही संदर्भ सोडून केली जात आहे असंही त्या म्हणाल्या. धुळे शहरातील स्त्री शिक्षण संस्था संचलित कमलाबाई कन्या हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणा ढेरे यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवाजी महाराज यांच्यावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या, "महाराष्ट्र हा पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी विचार महाराष्ट्रात रुजला आहे. पण तो सर्वसामान्य माणसांच्या विचारामधून व्यक्त होत नाही हे दुर्दैव आहे. पक्षीय राजकारण आणि जात या पलीकडे जाऊन या माणसांनी आपल्याला काय दिलं आणि ज्ञानाचं क्षेत्र, समाज धारणेच क्षेत्र हे यांनी किती मोठं केलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्ञानवंतांनी जे निर्माण केलं त्यामागचा हेतू आणि दृष्टिकोन याला त्यांनी पणाला लावल होतं. त्यांनी आपलं सगळं आयुष्य खर्ची घातलं होतं ते समाजात भांडण लागावी यासाठी नाही."


सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या, "राजकारण्यांकडून काही अपेक्षा करावी असं वातावरण राहिलेलं नाही. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने इतका गोंधळ आणि अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहेत. आपल्या हातात काहीच नाही अशा प्रकारची हताश भावना सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे. ती नाहीशी करण्याचं काम या राजकारण्यांनी केलं पाहिजे. हे आपल्यासाठी काहीतरी करीत आहेत अशी जाणीवच राहिलेली नाही असं सगळ्याच क्षेत्रात आक्रमण झालेलं आहे, अपेक्षा करण्याच्या पलीकडचं आपण अनुभवत आहोत."


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर बोलताना अरुणा ढेरे म्हणाल्या कि, कलेच्या माध्यमातून इतिहासाची मांडणी ही संदर्भ सोडून केली जात आहे. इतिहासाची मांडणी करताना समाजभान जपलं पाहिजे. कशासाठी आपण हे करीत आहोत, त्याच्या मागच्या प्रेरणा वेगळ्या असतील तर इतिहासाला वेगळ वळण लागू शकतं आणि समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो.


ही बातमी वाचा: