Dhule News : धुळे (Dhule) जिल्ह्यातील बाळदे महावितरण (Mahavitaran) सबस्टेशनच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सीनिअर ऑपरेटरचा मृतदेह तापी नदीपात्रात (Tapi River) आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर तालुक्यात ही घटना घडली. प्रवीण गवते असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूपूर्वी "माझ्या मागे गुंड लागले आहेत, काय करु सुचत नाही" असा व्हॉट्सअॅप ग्रुपवर (WhatsApp Group) पाठवला होता. त्यानंतर दोन तासात त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला.


दुपारी तीनच्या सुमारास मेसेज, पाच वाजता मृतदेह तापी नदीत आढळला


शिरपूर तालुक्यातील बाळदे इथल्या सबस्टेशनमध्ये  प्रवीण विजय गवते (वय 42 वर्षे, रा.चिमठाणे ता. शिंदखेडा) हे सीनिअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची दुचाकी काल (4 जून) दुपारी गिधाडे तापी नदीपुलावर बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे इथल्या सबस्टेशनवर होते. काल सकाळी 8:30 वाजता ते घरी चिमठाणे इथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र दुपारी 2 वाजून 52 मिनिटांनी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर एक मेसेज टाकला. या मेसेजनंतर दोन तासांनी त्यांचा मृतदेह तापी नदीत आढळला. 


व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजमध्ये काय म्हटलं?


प्रवीण गवते यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं की, "माझ्या मागे 4 ते 5 गुंड मुलं लागली असून ती सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाही. माझ्यासोबत तीन लाख रुपये आहेत, मी कसा तरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा." 


दोन तासांनी मृतदेह नदीपात्रात सापडला


ग्रुपमधील मेसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता. मात्र यानंतर त्यांची दुचाकी गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास प्रवीण गवते यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला. त्यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. 


मेसेजमुळे तर्कवितर्क


दरम्यान प्रवीण गवते यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेजमुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. प्रवीण गवते यांच्या मागे लागलेले गुंड कुठे गेले? त्यांनी आत्महत्या केली की स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चुकून नदीपात्रात उडी मारली. शिवाय आपल्याकडे तीन लाख रुपये असल्याचं त्यांनी मेसेजमध्ये लिहिलं होतं, ते पैसे कुठे आहेत, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.


हेही वाचा


Dhule News: आई-वडिलांची माफी मागितली अन् हॉस्टेलमध्येच विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचललं