Dhule-Dadar Express: गेल्या महिन्यात सुरू झालेल्या धुळे-दादर एक्सप्रेसला (Dhule-Dadar Express) प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता भुसावळ रेल्वे प्रशासनाने या गाडीला गुरुवारपासून तब्बल चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच स्लीपरचा एक डबा देखील स्वतंत्र जोडण्यात येणार असल्याने आता प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 18 मेपासून हा बदल अंमलात येणार असल्यामुळे धुळे, चाळीसगाव आणि नांदगावच्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
धुळ्यातून (Dhule) थेट मुंबईसाठीची (Mumbai) रेल्वे सेवा गेल्या महिन्यातच सुरू झाली आहे. यापुर्वी ही ट्रेन 11 डब्यांसह धावत होती. धुळ्याहून मुंबईसाठी ही रेल्वे सोमवार, मंगळवार आणि शनिवारी निघणार आहे. तर, मुंबईहून धुळ्याकडे जाण्यासाठी रविवारी, सोमवारी आणि शुक्रवारी ही रेल्वे उपलब्ध होणार आहे. धुळेकर नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून केलेली या रेल्वेची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
धुळे-दादर एक्सप्रेस सेवा सुरू झाल्यापासून या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे डब्यांच्या अपूर्ण संख्येमुळे अनेकांना अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी धुळे-दादर एक्सप्रेसला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय भुसावळ रेल्वे प्रशासनाने घेतला. धुळे-दादर एक्सप्रेसचा एक डबा वातानुकुलित आहे, तर एक डबा स्लीपरचा आहे.
दरम्यान, रेल्वेने धुळे-दादर एक्सप्रेसला चार डबे वाढवण्याच्या निर्णयाचे प्रवासी वर्गाने स्वागत केले आहे. या गाडीचे रॅक एकवीस डब्यापर्यंत वाढवत न्यावे आणि गाडी दररोज सोडावी, यासह गाडीला इंटरसिटी एक्स्प्रेसचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यास लवकरच धुळे-दादर एक्सप्रेस दररोज सोडण्याचा देखील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबई-गोवा मार्गावर देखील धावणार हायस्पीड ट्रेन
मुंबई-गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी (16 मे) यशस्वी चाचणी देखील घेण्यात आली. मुंबईतून सुटणारी ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) असणार आहे. यापूर्वी मुंबई सीएसएमटी-अहमदाबाद-गांधीनगर, मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी, मुंबई सीएसएमटी-सोलापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता मुंबई सीएसएमटी ते गोवा मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
हेही वाचा: