Dhule News : धुळ्यातील (Dhule) पाटील दाम्पत्याने कन्यारत्नाचे (Girl Child) अनोख्या पद्धतीने स्वागत करत मुलीच्या जन्मानंतर नाक तोंड मुरडणाऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण करुन दिला आहे. कन्यारत्न प्राप्तीच्या आनंदात पाटील दाम्पत्याने चक्क गावातील घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांचा 20 टक्के कर (Tax) भरण्याचा निर्णय घेतला आहे. या दाम्पत्याने तशी घोषणाच केली आहे. अनोख्या पद्धतीने कन्यारत्न जन्माचे स्वागत केल्याने संपूर्ण जिल्हाभरातून सरपंच नंदिनी पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
गावासोबत चिमुकलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याचा निर्णय
एकीकडे मुलगी जन्माला आल्यानंतर कुटुंबीयांमध्ये काहीशी नाराजी बघायला मिळत असते. परंतु धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावातील पाटील दाम्पत्य याला अपवाद ठरलं आहे. दबाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच नंदिनी पाटील यांच्या पोटी दुसऱ्यांदा कन्यारत्न जन्माला आलं. या चिमुकलीचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले आहे. नुसते स्वागतच नाही, तर या दुसऱ्या मुलीच्या जन्माचा आनंद या दाम्पत्याने संपूर्ण गावासोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे ग्रामस्थांचा 20 टक्के कर भरण्याचा.
पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांचा 20 टक्के कर भरणार
या पाटील दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. दुसऱ्यांच्या त्यांना मुलगी झाली. ज्याप्रमाणे मुलाच्या जन्माचा आनंद साजरा केला जातो, त्याचप्रमाणे त्यांनी मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा केला आहे. खरंतर या मुलीच्या जन्मोत्सवात गावात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची यापूर्वीच तारीख व्यस्त असल्यामुळे कीर्तनाचा कार्यक्रम करणे शक्य होत नव्हता. त्यामुळे कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या या महिला सरपंच नंदिनी पाटील आणि त्यांच्या पतीने गावातील पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांचा 20 टक्के कर भरण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे मुलगी जन्माला आल्यानंतर संपूर्ण कुटुंब मुलीच्या जन्मामुळे नाराज असल्याचं चित्र अजूनही पाहायला मिळलं. परंतु ही मानसिकता खोडून काढण्यासाठी पाटील दाम्पत्याने घालून दिलेला आदर्श नक्कीच मुलीच्या जन्माचा विरोध करणाऱ्यांसाठी चपराक असणार आहे.
पुण्यात चिमुकलीचं वाजत-गाजत स्वागत
मागील महिन्यात लेकीच्या जन्माचा पुण्यात मोठा सोहळा साजरा करण्यात आला. कुटुंबात जन्मलेल्या कन्यारत्नाचे वाजत गाजत मिरवणूक काढून फटाके वाजवीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नववर्षात घरी स्वागत करण्यात आलं. पुण्यातील बोपोडी परिसरात राहणाऱ्या मंगेश गायकवाड यांनी घरातील कन्यारत्नाचं वाजत जागत स्वागत केलं आहे. मंगेश गायकवाड यांच्या घरी तिसर्या पिढी नंतर कन्यारत्न झाले असून आजोबा मंगेश किसन गायकवाड यांनी जल्लोषात नातीचे स्वागत केले. कन्यारत्नाचे घरी येताच घरातील सुवासिनी कन्येसह तिच्या आईचे औक्षण केले.
हेही वाचा
Pune news : तीन पिढ्यानंतर घरात झाला मुलीचा जन्म; वाजत-गाजत केलं लेकीचं स्वागत