धुळे : समाजात रुढी, परंपरांना छेद देण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. समाजातील स्त्री-पुरुष भेदाभेद आजही पूर्णपणे मिटलेला नाही, याचा प्रत्यय वेगवेगळ्या घटनांमधून येत असतो, हे वास्तव आहे. या वास्तवाला छेद देणारी घटना नुकतीच धुळे (Dhule) जिल्ह्यात घडली आहे. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे यांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी मुली, सुना आणि बहिणींनी खांदा देत परिवर्तनाच्या वाटेवर एक पाऊल पुढे टाकले आहे.
अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढी, परंपरांना झुगारून हळूहळू महाराष्ट्रात (Maharashtra) बदल होताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात आजही अनिष्ट रूढी परंपरा जपल्या जातात. मात्र याच दुसऱ्या बाजूला या परंपरांना बाजूला सारत परिवर्तनाच्या वाटेवर जाणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढत आहे, हे अभिमानास्पद आहे. याच उत्तम उदाहरण धुळे जिल्ह्यातून समोर आले आहे. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड (Borkund) येथील रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी वसंतराव राघो भदाणे यांच्या अंत्यविधीवेळी पुरुष खांदेकरी ऐवजी सून माधुरी भदाणे (Madhuri Bhadane), अनिता भदाणे, कन्या जागृती सोनवणे, पुतणी डॉ. रोहिणी शिंदे, कृषि पर्यवेक्षक प्रियंका पाटील, नलिनी पाटील यांच्यासह बहिणी सिंधूबाई पवार, चित्राबाई सोनवणे, आशाबाई शिंदे, निर्मला सूर्यवंशी या महिला खांदेकरी झाल्याचे दुर्मिळ उदाहरण याची देही याची डोळा बोरकुंडकरांनी अनुभवले.
वसंतराव भदाणे (Vsantrao Bhadane) यांचं प्राथमिक शिक्षण बोरकुंड येथे झालं, तर माध्यमिक शिक्षण धुळे येथील मराठा बोर्डिंग येथे पूर्ण केले. जूनी मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे नोकरी न करता शेती व्यावसायाकडे लक्ष केंद्रित केले. शेती व्यवसाय करत असतांना अतिशय काबाडकष्ट करुन शेतीत अनोखे प्रयोग करत एकत्र कुटुंबाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. उत्कृष्ट आदर्श प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली. शेती करत असतांना गाव परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर यांना सौजन्याची वागणूक दिल्यामुळे आपुलकीची भावना निर्माण केली होती. नुकतंच त्यांचं निधन झालं. ते बोरकुंड येथील डॉ. राजेश पाटील यांचे बंधू, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे व अनिता भदाणे यांचे सासरे होते. अंत्यविधीवेळी रूढी परंपरा झुगारून पत्नी लता भदाणे यांच्या हस्ते पूजन करुन जिजाऊ वंदनेने अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. तर सुना, बहिणी, मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला छेद देणारी भदाणे कुटुंबीयांची ही कृती समाजासाठी अनुकरणीय ठरली आहे.
महिलांनी पुढं येणं गरजेचे....
कोणत्याही कामाची सुरुवात आपल्यापासून करणे गरजेचे असते. समाजात बदल घडवायचं असेल तर महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे. सासरे वसंतराव भदाणे यांच्या अंत्यविधी प्रसंगी कोणतेही कर्मकांड, चुकीच्या परंपरा न करता वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून व विधवा महिलांचा सन्मान करत अंत्ययात्रा झाली. यासाठी भदाणे परिवार व गावकऱ्यांनी दिलेली साथ निश्चित मोलाची असल्याचे भदाणे यांच्या सुनबाई माधुरी भदाणे यांनी सांगितले. बोरकुंड येथे रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात मरण आणि तोरण प्रसंगातील चुकीच्या प्रथा या विषयावर व्याख्यान, शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव आणि वृक्षारोपण होणार आहे.
इतर महत्वाची बातमी :