धुळे: चोरट्यांनी चोरीच्या सर्व सीमा पार केल्याचा प्रकार धुळे शहरात (Dhule Crime) घडला आहे. घरांमध्ये चोरी करणाऱ्या चोरांनी आता चक्क शहरातील श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरातील मूर्तीच्या चांदीच्या डोळ्याची चोरी (Stolen silver eye of  Hanumana) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांमध्ये (Dhule City Police) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


धुळे शहरातील साक्री रोड भागात असलेल्या मोगलाई परिसरामधील महाले नगरात श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिरात (Hanumana Temple) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटक चोरट्यांनी ही चोरी केली. शहरातील सामाजिक वातावरण दूषित करण्याच्या हेतूने हनुमान मंदिरात असलेल्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून नेत मूर्तीची देखील विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धुळे पोलीस अधीक्षक (Dhule Police SP) यांची भेट घेऊन संबंधित समाजकंटक चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.


शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. धुळे शहरातील अनेक भागात चोरट्यांचा वावर वाढला आहे. चोरट्यांनी आता बंद घरानंतर मंदिरं आणि दर्ग्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. बेलगाम झालेल्या चोरट्यांना पोलिस जेरबंद कधी करणार असा प्रश्न आता धुळेकर नागरिक विचारत आहे.


हिंदू धर्माचे प्रेरणास्थान असलेल्या हनुमान मूर्तीची अशाप्रकारे विटंबना करून हिंदू बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे कृत्य या अज्ञात चोरट्यांनी केले आहे. यापूर्वी देखील याच हनुमान मंदिरातील दानपेटी पेटवण्याचा देखील प्रयत्न झाला होता. मात्र या भागातील लोकांनी सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून सदर प्रकरण शांत केले होते. मात्र पुन्हा-पुन्हा असे प्रकार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही असा पवित्र या परिसरातील नागरिकांनी घेतला.


नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर असताना अशा पवित्र वातावरणात जर कोणी जाणून-बुजून असं काम करणार असेल तर आता आम्ही अशा विकृतींच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत अशी प्रतिक्रिया देखील परिसरातील नागरिकांनी यावेळी दिली.


आता धुळे शहरातील या चोरट्यांचा पोलीस प्रशासन कशाप्रकारे बंदोबस्त करतात आणि धुळे शहरातील महाले नगरात झालेल्या हनुमान मंदिरात झालेला प्रकार किती गांभीर्याने घेतात हे देखील येणाऱ्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.