Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज धुळे दौऱ्यावर आले असता त्यांनी संघटनात्मक बैठक या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांशी आपल्या भाषणातून संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांनी आपल्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचे एकही कार्यकर्ते उमेदवारी लढवण्यासाठी शिल्लक ठेवू नका. यावेळी त्यांनी भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश करून घेण्याचे काम तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी करण्याचे आवाहन देखील केले.


कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकीकडे महानगरपालिका, पालिकांच्या निवडणूक आहेत. आपण धुळे शतप्रतिशत केली आहे. मात्र आपल्याला पुन्हा धुळे शतप्रतिशत करायची असले तर भाजपच्या  कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या बूथ लेव्हलच्या एक-एक कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. आपल्याला संकल्प करायचा आहे की, पुढच्या काळात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला निवडणूक लढवण्यासाठी एकही कार्यकर्ता धुळ्यात मिळाला नाही पाहिजे.   


'आपल्याकडे फक्त 200 दिवस आहेत'


बावनकुळे म्हणाल की, महानगरपालिका, पालिका, पंचात निवडणुका झाल्यानंतर एक वर्षानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. पाऊस, सणवार सोडले तर आपल्याकडे फक्त 200 दिवस शिल्लक आहेत. या 200 दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्र पुन्हा नंबर एक करून दाखवायचा असेल तर मेहनत करावी लागेल. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव गट हे तिन्ही पक्ष एकत्र आलेत आहेत. यातच आपण वरची आणि खालची ताकद एकत्र करू आणि 51 टक्केची लढाई लढू आणि महाराष्ट्रातून 45 हून अधिक जागा जिंकून आणू.    


बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा कर्तृत्ववान कार्यकर्ता, ज्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मात्र ज्या दिवशी या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी राज्यातील सर्वात मोठं मुख्यमंत्रीपद सोडून दिलं. तत्पूर्वी रविवारी ते एका कार्यक्रमात म्हणाल की, ''पुढच्या काळात मी मुख्यमंत्री झालो पहिजे, असा काही जणांनी उल्लेख येथे केला. पण कर्तृत्ववान अष्टपैलू असे फडणवीस हे माझ्या पाठीशी उभे राहिले. मला त्यांनी उर्जा दिली. आज आपले कर्तव्य आहे की, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या काळात फडणवीस यांनीच नेतृत्व करायला हवे. मी जबाबदारीने सांगतो की जात, धर्म पंथाच्या बाहेर जाऊन एक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते हे फडणवीस आहेत.''