धुळे : मुंबईतील (Mumbai) एका पार्टीला स्वस्तात कॉपर केबल (Copper Cable) देण्याचे आमिष दाखवून मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीला 24 तासांच्या आत जेरबंद करण्यात निजामपूर पोलिसांना (Nizampur Police) यश आले आहे. या टोळीतील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 13 लाख 50 हजारांची रोकड (Cash) जप्त करण्यात आली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, साक्री (Sakri) तालुक्याच्या जामद्यातील ठग स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून लुटमार करण्यासाठी कुख्यात आहे. या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला. तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किमतीत देवू असे आमिष दाखविले. त्यानुसार 44 टन कॉपर वायरसाठी 2 कोटी 44 लाख रुपयांत देण्याचे ठरले. त्यासाठी ठगांनी 22 ते 23 लाखांची आगाऊ मागणी केली. त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक हरिष सुजेश पवार, मॅनेजर सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर व त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकूमसिंग प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा हे दोन चारचाकी वाहनांनी पेटले गाव शिवारातील सुझलॉन कंपनीजवळ आले. 


24 लाख 58 हजारांचा ऐवज लुटला


सुझलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते. यात इक्बाल चव्हाण (रा. जामदा), अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश येंकी पवार, राजेश पवार व अन्य दोन-तीन जणांचा समावेश होता. त्यांनी मुंबईतील या पार्टीला मारहाण करुन हरिष पवार यांच्या ताब्यातून 22 लाख 3 हजारांची रोकड, 2 लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 24 लाख 58 हजारांचा ऐवज लुटून नेला. 


13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत


या घटनेनंतर हरिष पवार यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून 24 तासांच्या आत यातील तीन संशयितांना ताब्यात घेऊन 13 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली आहे. ही घटना ड्रॉप केस या प्रकारातील असून या घटनेतील तीन आरोपींना तात्काळ अटक करुन 13 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 


स्वस्तातील कॉपर वायरच्या आमिषाला बळी पडू नये


दरम्यान, उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल. तसेच 100 टक्के मुद्देमाल रिकव्हर केला जाईल. अशा प्रकरच्या अनेक घटना जमादा या गावात घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही स्वस्तातील कॉपर वायरच्या आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन धुळे जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.


आणखी वाचा


Nashik Crime : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना नाशिक पोलिसांचा दणका, थेट रस्त्यावर वरात काढली