धुळे : मुंबई आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ गेल्या दोन दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघातात चांदणी पावरा या चिमुकलीने आपला आठ वर्षांचा भाऊ गमावला आहे, या घटनेनंतर या चिमुकलीचा हुंदका हा कोळशापाणी पाड्यावर अंगावर काटा आणणारा होता. 


कोळशापाणी पाड्यावर अपघातानंतर मोठा आक्रोश


मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरती झालेल्या पळासनेर गावा जवळच्या अपघातात 10 जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात 27 जण जखमी झाले. सिमेंट फॅक्टरीसाठी लागणारी खळी घेऊन जाणारा कंटेनर हा ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित होऊन एका हॉटेलमध्ये घुसला आणि हा भीषण अपघात घडला.यादरम्यान कंटेनरने दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात आपली जवळची माणसे गमावलेल्या लोकांनी घटनेनंतर एकच आक्रोश केला. मात्र या सगळ्यात एका चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हा झालेल्या अपघात इतका भीषण होता की, मजूर अक्षरश: चिरडले गेले. रस्त्यावर रक्ताचा पाट वहात होते आपली काही चूक नसतानाही 10 जणांचा हकनाक बळी गेला तर, 27 जण जखमी झाले. पाळसनेरजवळ असलेल्या कोळशापाणी पाड्यावर या अपघातानंतर मोठा आक्रोश होता.


या सगळ्यात एका चिमुकलीचे हुंदके मात्र मन हेलावून टाकणारे होते. सात वर्षांची चांदणी पावरा ही चिमुकली एकटीच घराबाहेरच्या भिंतीला डोकं लावून रडत बसली होती. तिला आधार देणारं ना घरात कोणी होतं, ना बाहेर. तिला रडण्याचं कारण विचारलं असता तिने सांगितलं, की आई भावाला शाळेत सोडवण्यासाठी पळासनेरला गेली होती. तेव्हा अपघात झाला. त्यात पंकज पावरा या तिच्या भावाचा मृत्यू झाला आणि आई नंदिनी जखमी झाली असून ती सध्या दवाखान्यात आहे. 


दुर्दैवाने या चिमुकलीच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आईच घर सांभाळते आणि मुलांचा सांभाळ करते. अशात या अपघातात तिने वडिलांनंतर भाऊही गमावला.आई नक्की कुठे असेल? अशा विचारांनी या चिमुकलीच्या डोळ्यांमध्ये अश्रू तरळत होते. या अपघतात अवघ्या 235 घरांच्या पाड्यातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची घोषणा केली खरी ही पाच लाख रुपयांची मदत त्यांच्यापर्यंत कधीतरी पोहोचेल सुद्धा, मात्र चांदणीला तिचा गमावलेला भाऊ आणि तिच्या आईला तिचा मुलगा हे परत कधीही मिळणार नाहीत हे मात्र निश्चित