Shivrayancha Chhava धुळे : गेल्या काही वर्षांपासून ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट येत्या 16 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे भूषण पाटील हे मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत.


मराठी चित्रपटसृष्टीत फक्त शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज सुभेदार हे चित्रपट अजरामर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरगाथांवर आधारित हा चित्रपट आहे. 


जीवनचरित्राचा केला अभ्यास


या चित्रपटात धुळे शहरातील रहिवाशी असणाऱ्या भूषण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी भूषण यांना त्यांच्या जीवनचरित्राचा देखील अभ्यास करावा लागला आहे.


धुळ्याचे नाव चित्रपटसृष्टीत झळकले


मल्हार पिक्चर्स कंपनी आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लांजेकर यांनी केले आहे तर निर्मिती वैभव भोर यांची असून या चित्रपटामुळे तसेच भूषण पाटील यांनी साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे धुळ्याचे नाव चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 


...म्हणून झाली भूषण पाटील यांची निवड


लहानपणापासून भूषण पाटील यांना अभिनयाची आवड आहे. मुंबईच्या मायानगरीत मोठ्या प्रमाणावर स्ट्रगल करीत भूषणने मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यातूनच त्याला चित्रपटांमध्ये संधी मिळाली असून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी लागणारी भारदस्त शरीर यष्टी आणि त्यासाठी लागणारा लुक भूषण यांच्यात आढळल्यामुळे त्याची निर्माता आणि दिग्दर्शकांनी निवड केली आहे. 


45 दिवसांत शुटींग पूर्ण


या भूमिकेला न्याय देण्यासाठी भूषण यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील काही पुस्तके वाचली असून तब्बल 45 दिवसांच्या शूटिंग नंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भूषण पाटील हे मूळचे शिंदखेडा तालुक्यातील पडावद येथील रहिवासी असून कुटुंबातून अभिनयाची किंवा चित्रपटसृष्टीची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी या क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे.


चित्रपटात 'या' कलाकारांचाही सहभाग


भूषण यांच्यासोबत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर,विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, अमित देशमुख, अवधूत गांधी, रवी काळे या दिग्गज कलाकारांचादेखील समावेश आहे.


आणखी वाचा 


Nashik News : अन्न व औषध प्रशासनाची नाशिकमध्ये मोठी कारवाई; साडे चार लाखांचा पॅकेज्ड ड्रिंकिग वॉटर साठा जप्त