धुळे : तालुक्यातील दोंदवाड गावाला 2019 च्या वॉटर कप स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. मात्र ज्या ठिकाणी हे काम करण्यात आलं होतं त्या गावठाण जागेवर ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्याचं वृत्त एबीपी माझाने प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत काल (1 जून) हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवलं आहे.


दुष्काळग्रस्त महाराष्ट्र ही ओळख पुसली जावी यासाठी सत्यजित भटकळ, आमिर खान, किरण राव आणि रीना दत्ता यांच्या संकल्पनेतून पानी फाऊंडेशनची स्थापना झाली. पानी फाऊंडेशनचा उद्देश राज्यभरातील अनेक गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत करणे हा आहे. या संस्थेच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धा घेण्यात आली होती. 2019 साली या स्पर्धेत धुळे तालुक्यातील दोंदवाड हे गाव सहभागी झालं होतं. या गावाला या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालं होतं. गावाच्या मोठ्या गावठाण जागेवर तलाव बांधून तब्बल 55 कोटी लिटर पाणी अडवण्यात आलं होतं, यामुळे संपूर्ण गाव सुजलाम-सुफलाम झालं होतं.


मात्र दोनच वर्षात या गावठाण जागेवर ज्या ठिकाणी पाणी अडवण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलं. अनेकांनी या ठिकाणी घरे बांधण्यास सुरुवात केली तर काहींनी वॉल कम्पाऊंड बांधलं. याठिकाणी लावण्यात आलेली झाडं देखील तोडण्यात आली. या अतिक्रमणाबाबत जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे वारंवार तक्रार करुन देखील कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे यंदा होणाऱ्या पावसाळ्यात पाणी अडवायचे तरी कसं असा महत्त्वाचा प्रश्न या अतिक्रमणामुळे उभा राहिला होता. त्यामुळेच इथलं अतिक्रमण काढण्याची मागणी करण्यात आली होती. 


याबाबतचं वृत्त काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने 30 मे रोजी प्रसारित केलं होतं. या वृत्ताची धुळे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत बुधवारी मंडळ अधिकारी समाधान शिंदे यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात या पानी फाऊंडेशनच्या जागेवरील अतिक्रमण अखेर हटवण्यात आलं. यावेळी या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 


संबंधित बातम्या


Paani Foundation : पृथ्वीचं संवर्धन करणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत पानी फाऊंडेशन जगात नंबर वन!



टीमवर्कमधून समृद्ध गावांची निर्मिती शक्य; पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य