Aamir Khan : अभिनेता अमीर खानने राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची नुकतीच भेट घेतली आहे. पाणी फाऊंडेशनसाठी काम करणारा अभिनेता अमीर खान सध्या शेतकऱ्यांसाठी काम करत आहे. त्याने राज्यातील सोयाबीनचे उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात सर्वात अधिकच्या क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढावे, शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी अमीर खानच्या टीमने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन शाळा घेतली होती. दर रविवारी ऑनलाईन माध्यमातून शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणी पासून ते बाजारपेठेपर्यंतचे मार्गदर्शन केले जात होते. यावेळी पाणी फाऊंडेशन सोयाबीन उत्पादन वाढीबाबत तयार केलेल्या पुस्तिकेचे दादाजी भुसे आणि अमीर खान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
 
शेतकऱ्यांना उत्पादन घेताना येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यावर मात करायची कशी याविषयी माहिती देणारे 'सोयाबिन डिजिटल शेती शाळा-पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' हे पुस्तक काढले आहे. यामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला लाभ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच सोयाबीन उत्पन्न वाढीस चालना मिळेल. शेतकऱ्यांची उत्पादकता व निर्यातक्षम माल कसा वाढवता येईल यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले. यावेळी कृषी विभाग प्रधान सचिव एकनाथ डवले, पाणी फाऊंडेशन कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, संचालक (संशोधन व विस्तार शिक्षण) डॉ. शरद गडाख तसेच सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार उपस्थित होते.




आतापर्यंत महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाली आहेत. दरम्यानच, या टीमच्या निदर्शनास आले की सोयाबीनचे हे मुख्य पीक असूनही त्याची उत्पादकता कशी नाही? त्याच अनुशंगाने राज्यातील कृषी विद्यापीठातील संशोधकांशी चर्चा आणि प्रत्यक्ष बांधावरची स्थिती काय आहे पाहून या पाणी फाऊंडेशनच्यावतीने एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. ज्याचा वापर आता सोयाबीनचे उत्पादन वाढवण्यासाठी होणार आहे.


सोयाबीन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध असणार आहे.  याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. या फार्म शाळेसाठी 46 हजार 327 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यासाठी 13 लाईव्ह प्रश्नोत्तरांच्या सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पाणी फाऊंडेशन कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांनी दिली. यामध्ये 5 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून सोयाबीन उत्पन्न वाढीसाठी विविध प्रश्न विचारण्यात आले. ट्रेनिंग व्हिडीओ आणि व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यात आली. यामध्ये बियाणांची निवड, उगवण क्षमता, तपासणी, बीजप्रक्रिया, पेरणी, एकात्मिक खत व्यवस्थापन, पॅकिंग, मार्केटींग  या विषयीची माहिती शेतकऱ्यांना देण्यत आल्याची माहिती  राज्यात 21 मे ते 3 ऑक्टोबर यादरम्यान, शाळेत सहभागी होऊ इच्छिनाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन पॉर्म भरणे गरजेचे होते. 


राहुरी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचीही मदत झाल्याचे पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान यांनी सांगितले. आता पुढे यावर मोठ्या प्रमाणावर काम चालणार आहे. दुष्काळी भागात आमिर खान आणि त्यांच्या टीमने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठी कामे केली आहेत. यामुळे अनेक ठिकाणचा दुष्काळ कायमचा दूर गेला आहे. आता या कामात देखील असाच फायदा शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.