Maharashtra Dhule News : आधी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर गावाजवळ झालेला अपघात यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या चार वर्षांत 887 अपघात झाले आहेत. 278 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. 


राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत, असा सूर आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याला कारण आहे वाढती अपघातांची संख्या. मागील शनिवारी समृद्धी महामार्गावर झालेला बसचा भीषण अपघात आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला कंटेनरचा भीषण अपघात यामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. वाढती अपघातांची संख्या ही सध्या चिंतेची बाब आहे. 


धुळे जिल्ह्यातून मुंबई - आग्रा आणि नागपूर - सूरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या दोन महामार्गांवरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते, शहरांसह जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या, महामार्गावरून वाहन चालविताना होणारं नियमांचं उल्लंघन ही वारंवार अपघात होण्यामागील प्रमुख कारणं आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही महामार्गांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, धुळे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तब्बल 887 अपघात झाले असून 278 जणांचा मृत्यू झाला आहे. 


धुळे जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी 18 ठिकाणं अशी आहेत की, तिथे सातत्यानं अपघात होतात. मात्र या ब्लॅक स्पॉट समजला जाणाऱ्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, सूरत नागपूर महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम अजूनही संथ गतीनं सुरू आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असली तरी दुसरीकडे मात्र होणाऱ्या अपघातांची संख्या अफाट असल्यानं हे अपघात रोखण्यासाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर झालेला भीषण अपघात 


धुळे - मुंबई - आग्रा महामार्गावर (Dhule-Mumbai-Agra Highway) पळासनेर (Palasner) गावाजवळ भीषण अपघात (Accident) झालेला. ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला होता. या अपघातात 12 जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला होता. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले होते. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.