धाराशिव : धाराशिवमधील (Dharashiv) सावकारीत लुबाडलेली शेतकऱ्यांची (Farmer) जमीन परत करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पाच सावकारांना चपराक बसलीये. शेतकऱ्यांची जमीन या सावकारांनी त्यांच्या सावकारीचा गैरफायदा घेऊन लुबाडली होती. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील जळकोट या गावातील खासगी सावकार तुकाराम कदम आणि दत्तू कदम यांनी शेतकऱ्यांची  49 एकर जमीन लुबाडली. दरम्यान ही जमीन सावकारकीच्या व्यवहारातील असल्याचे घोषित करत जमिनीचे खरेदीखत रद्द करण्यात आले. त्यानंतर या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश या सावकारांना देण्यात आले आहेत. 


दरम्यान शेतकऱ्यांनी सावकाराला 1 कोटी 30 लाख रुपये देण्याची तयारी देखील दर्शवली. पण तरीही सावकाराने त्यांची जमिनी परत केली नाही. त्यामुळे सावकारांना जास्तीचं व्याजदर आणि जमीनी हडप करण्याचा मोह आता अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. तर आता या सावकारांना शेतकऱ्यांच्या जमिनी या परत कराव्या लागणार आहेत. 


नेमकं प्रकरण काय?


सावकार कदम आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सावकारांनी बोरगाव येथील शेतकरी सिद्रामप्पा आणि गुरुसिद्धप्पा मुळे या दोन शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या. दरम्यान  2004 साली व्याजाने पैसे देऊन त्यांनी या शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवल्या. व्याजासह पैसे देऊनही सावकाराने या शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या नाहीत. जमीन जरी सावकाराकडे गहाण असली तरी वर्षानुवर्षे त्याचा पूर्ण ताबा शेतकऱ्याकडे होता. त्यामुळे ही 49 एकर जमीन सावकाराला पुन्हा शेतकऱ्याला द्यावी लागली. 


सख्खे भाऊ असल्यामुळे या शेतकऱ्यांची तुळजापूर तालुक्यातील बोरगाव तुपाचे येथील वडिलोपार्जित गट नंबर 31 मधील 12 हेक्टर 22 आर, गट नंबर 54 मधील 5 हेक्टर 12 आर व गट नंबर 22 मधील 2 हेक्टर 23 आर जमीन सावकार तुकाराम कदम आणि त्याचा मुनीम दत्तू कदम याला व्याजाने पैसे देऊन खरेदीखत करुन दिले होते.  2004 साली त्यांनी 8 लाख 85 हजार आणि नंतर 2 लाख 20 हजार असे 5 टक्के व्याजाने घेतले होते. 


सावकाराने व्याजावर जमिनी लाटल्या


व्याजाची रक्कम थकल्याने सावकराने टप्प्याटप्प्याने या शेतकऱ्यांच्या जमिनी  स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या खेरदी केल्या. या दरम्यान शेतकऱ्यांनी काही पैसे हे सावकार कदम याला चेकने दिले होते, जे त्यांनी बँकेत देखील जमा करुन घेतले होते. पण तरीही या सावकराकडून शेतकऱ्यांचा जाच सुरुच होता. तर तडजोडीने वाद संपवण्यासाठी 2016 साली सावकारांनी या शेतकऱ्यांकडे  1 कोटी 30 लाख इतक्या रकमेची मागणी केली. तर या शेतकऱ्यांनी ती देखील रक्कम देण्याची तयारी दर्शवली. पण तरीही सावकारांनी त्यांच्या जमिनी परत केल्या नाहीत. 


शेतकऱ्यांची  जिल्हा उपनिबंधकाकडे धाव


त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे धाव घेतली. कदम या सावकाराच्या नावाने याआधी देखील अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर सुनावणीअंती या जमिनीचा संपूर्ण ताबा हा शेतकऱ्यांकडे देण्यात आला. तर  सावकारकी घोषित करुन खरेदीखत रद्द करुन जमीन परत देण्याचे आदेश देण्यात आले. तर या सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 


सावकार तुकाराम खुशाबा कदम यांच्या तीन मुला विरोधात तक्रार दाखल होती. त्यात मुलगा अंगद तुकाराम कदम, किशोर तुकाराम कदम, सचिन तुकाराम कदम यांचा समावेश असुन मुनीम दत्तू बाजीराव कदम याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात मुनीम दत्तू हे हयात नसल्याने त्यांचे वारस पत्नी सुमन, मुली कविता, वर्षाराणी आणि ज्योती, मुलगा अनिरुद्ध आणि अनिकेत याच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. तर सावकार किशोर कदम देखील दिवंगत असल्याने त्याचे वारस पत्नी प्रीती, मुलगी स्वरा आणि मुलगा पियुष यांच्या बाबतीत केलेले व्यवहार सावकारकीमधूनच झाल्याचे आदेश देण्यात आले आहे.