धाराशिव : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) लाचलुचपत विभागाने (ACB) धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात मोठी कारवाई केली असून, तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) संस्थानचे वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे याला सुमारे 6 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास त्यांना लाच घेतांना पकडण्यात आले आहेत.  3  कोटी 88 लाखांच्या कामापैकी थकलेले 1 कोटी 88 लाखांचे बिल मंजुरीसाठी शिंदे याने 10 लाख रुपये मागितले होते. तडजोडीअंती 6 लाख रुपये घेतांना त्याला ताब्यात घेण्यात आले. 


छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, "यातील तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 03 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे. या बांधकामाचे आत्तापर्यंत 02 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579 रुपये ही परत मिळवून देण्यासाठी शिंदे याने पंचासमक्ष 10 लाख रुपयाची मागणी करुन, तडजोडीअंती 6 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवारी रोजी पंचासमक्ष 6 लाख रुपये लाच रक्कम स्विकारताना लाचलुचपत विभागाने शिंदेला ताब्यात घेतले.  या प्रकरणी पोलीस स्टेशन तुळजापुर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिलीच कारवाई 


धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थान राज्यातील एक मोठं मंदिर संस्थान पैकी एक आहे. रोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. राज्याचं नाही तर देशभरातील भाविक तुळजाभवानी मंदिराच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे मंदिर संस्थानात मोठ्या प्रमाणात देणग्या देखील येतात. मात्र, याच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वित्त व लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे हा लाचखोर निघाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मंदिर संस्थानच्या इतिहासात पहिलीच लाचलुचपतची कारवाई असल्याचे देखील बोलले जात आहे.


सिद्धेश्वर शिंदेचे आणखी वाटेकरी कोण? 


श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी सिद्धेश्वर शिंदे याने थेट 10 लाखाची मागणी केली. तडजोडीअंती 6 लाख रुपये स्विकारण्याचे मान्य केले. पण शिंदे याने एकट्याने एवढी मोठी रक्कम लाच म्हणून मागणे आणि ती स्वीकारण्याची हिंमत करणे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिंदे याच्यासह आणखी काही वाटेकरी असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एसीबीच्या चौकशीत या वाटेकरींचे नावं समोर येणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे म्हणाले, दाढीला धरुन खेचून आणलं असतं, शिंदे म्हणाले, या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली!