धाराशिव/चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर (Chandrpur) जिल्ह्यातील अभयारण्यात वाघांचा वावर असतो, येथील व्याघ्र दर्शनासाठी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, कधी-कधी या वाघांकडून स्थानिक रहिवाशांच्या जीवावर बेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता, पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सावली तालुक्यातील निलसनी-पेडगाव परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली. रेखाबाई मारोती येरमलवार (55) असे मृत महिलेचे नाव असून झाडणी (केरसुणी) साठी लागणारं गवत आणण्यासाठी त्या जंगलात गेल्या होत्या. त्यांच्यासोबतच्या महिलांनी महिलेवर वाघाने हल्ला केल्याची माहिती गावात दिली. त्यानंतर, वनपथक घटनास्थळी पोहोचले असून ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात बिबट्या (Leopard) आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर पहायला मिळाला. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्याने शेतातील लहान मोठी 9 जनावरे फस्त केल्याने ग्रामस्थांची भीती अधिकच वाढली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप लावण्यात आला, मात्र बिबट्या अद्याप पिंजऱ्यात सापडला नाही. तालुक्यातील कपिलापुरी,सोनारी, रूई, खामसगाव,सोनगिरी,कारंजा, भोंजा, वागेगव्हाण, लोणी व खासगाव या दहा गावांमध्ये बिबट्या आढळून आल्याच सांगितलं जात आहे.
वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात वन कर्मचारी तैनात केले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, खासापुरी येथील एका महीलेला हा बिबट्या दिसला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, वन्य जीवांचा अशाप्रकारे मानवी वस्तीत वावर झाल्याने नागरिकांमध्ये भीती असून वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.