नवी दिल्ली : देशभरात जवळपास 52 बॉम्बस्फोट घडवून आणलेला कुख्यात दहशतवादी डॉ. जलीस अन्सारीला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्णयानंतर डॉ. जलीस अन्सारी व्यथित झाला होता. त्यानंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यानंतर त्याची अस्वस्थता आणखी वाढली होती. त्यामुळे डॉ. बॉम्ब उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर येत आहे.


डॉ. बॉम्ब अजमेर जेलमधून पेरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो आपल्या मुंबईतील घरी आला होता. मात्र त्यानंतर अचानक तो गायब झाला. कानपूरच्या स्पेशल टास्क फोर्सने 17 जानेवारीला त्याच्या मुसक्या आवळल्या. कानपूरमध्ये येऊन तो बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होता. त्यासाठी नवं तंत्रज्ञान वापरुन बॉम्ब बनवणार होता. जलीसने आपलं जुनं नेटवर्कही कानपूरमध्ये अॅक्टिव्ह केलं होतं. राम मंदिराचा निर्णय आल्यानंतर त्याची बदला घेण्याची भावना तीव्र झाली होती.


न्यायालयाने डॉ. जलीस अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई, कानपूर अशा अनेक ठिकाणी त्यांना बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्यासाठी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. जलीस अन्सारीने 1993 मध्ये कानपूरमध्ये हावडा-दिल्ली आणि दिल्ली-हावडा एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. याशिवाय मुंबईतील आझाद मैदान परिसरात चार, जयपूरच्या झवेरी बाजारात आणि हवा महलजवळ तीन स्फोट घडवून आणले होते.


यामुळे जलीस अन्सारीला दहशतवादी डॉ. बॉम्ब नावाने ओळखायचे. जलीस अन्सारीला बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण करीम टुंडाने दिली होती. जलीस अन्सारी एमबीबीएस डॉक्टर असून महापालिकेच्या रुग्णालायत डॉक्टर म्हणून सेवा बजावत होता. अत्यंत हुशार असलेल्या जलील अन्सारीची 1980 च्या सुरुवातीला पुण्यात अब्दुल करीम टुंडा याच्याशी भेट झाली. दोघंही मूळ मालेगावचे असल्याने त्यांची विचारसरणी जुळली. तिथून जलीलचा दहशतवादी होण्याचा प्रवास सुरू झाला. अब्दुल करीम टुंडाला जलीलने गुरू मानलं आणि टुंडाने याची हुशारी पाहून त्याला बॉम्ब बनवण्यास सांगितलं.