Delhi Rape Case: राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातून निलंबित करण्यात आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यापासून दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Women's Commission) अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्वाती मालीवाल यांना रुग्णालय प्रशासनानं बलात्कार पीडितेला भेटण्यास नकार दिला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयाबाहेरच ठिय्या दिला. त्या रात्रभर रुग्णालयाबाहेरच बसून होत्या. अजूनही त्यांचं आंदोलन सुरूच आहे. आरोपी अधिकाऱ्याच्या अमानुषतेला बळी पडलेल्या महिलेला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. यासोबतच बलात्कारातील आरोपी अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केल्या आहेत.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल 21 ऑगस्ट रोजी पीडितेला रुग्णालयात भेटण्यासाठी आल्या होत्या, परंतु रुग्णालय प्रशासनानं त्यांना पीडितेला भेटू दिलं नाही. त्यानंतरही त्या पीडितेला भेटण्याच्या मागणीवर ठाम राहिल्या. रुग्णालय प्रशासनानं पीडितेला भेट न दिल्यामुळे त्यांनी हॉस्पिटलबाहेर ठिय्या दिला. रात्रभर त्या रुग्णालयाबाहेरच बसून होत्या. अखेर रुग्णालयाच्या संचालकांनी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची भेट घेतली. दिल्ली पोलिसांचे डीसीपी आणि एसीपी रुग्णालयात आहेत आणि त्यांनीच रुग्णालयाला पीडितेला भेटण्यास तुम्हाला (दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल) नकार देण्यास सांगितलं आहे. रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिल्यानंतरही स्वाती मालीवाल यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. आज मंगळवारीही त्यांचं आंदोलन सुरूच आहे.
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कारवाई
दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवन यांनीही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भाजपच्या काही नेत्यांकडून पसरवल्या जात असलेल्या खोट्या गोष्टींवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. बलात्काराचा आरोपी DCW चा कर्मचारी असल्याचा भाजपचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. DCW अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी भाजप नेत्यांची ही वक्तव्य खोटी असल्याचं म्हटलं आहे. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आणि आयोगाची बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
"आरोपी आणि त्याच्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, हे दुर्दैवी"
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू करण्यापूर्वी सांगितलं होतं की, "महिला आणि बाल विकास विभागात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानंच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणं अत्यंत दुर्दैवी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, एफआयआर नोंदवून 8 दिवस उलटून गेले तरी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही. दिल्ली पोलिसांच्या सांगण्यावरूनही मला पीडितेला भेटू दिलेलं नाही. दिल्ली पोलीस या माणसाला आणि त्याच्या पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत? हे माझ्या कल्पनेपलीकडचं आहे. आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी. मी पीडितेची भेट घेणार आहे. पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत मी करणार आहे.