Deenanath Mangeshkar : मराठमोळे गायक, अभिनेते, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर (Deenanath Mangeshkar) यांचा आज जन्मदिन आहे. अस्खलित वाणी, अद्वितीय गळा आणि तल्लख बुद्दी अशा अनेक गुणांसाठी दीनानाथ मंगेशकर ओळखले जात. 


बाबा माशेलकर हे दीनानाथ मंगेशकर यांचे पहिले गुरू होते. 1914 साली बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळी नावाची संस्था सुरू केली. त्यावेळी किर्लोस्करांनी गंधर्व नाटक मंडळीची दीनानाथांना ओळख करून दिली आणि या संस्थेमार्फत दीनानाथ रंगभूमीसोबत जोडले गेले. 


दीनानाथ यांनी 1915 साली 'ताजेवफा' या हिंदी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाट्यसंस्थेत चार वर्ष काम केल्यानंतर त्यांनी 1918 साली 'बलवंत संगीत मंडळी' नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. या नाट्यसंस्थेचा साहित्याकडे सर्वाधिक कल होता. नाट्य संगीताला महाराष्ट्रभरात ओळख देण्यात दीनानाथांचा मोठा हातभार आहे. 


आपल्या गायनाभिनयाने दीनानाथांनी 'भावबंधन' या नाटकातील लतिका, 'पुण्यप्रभाव'मधील कालिंदी, 'उग्रमंगल'मधील पद्मावती, 'रणदुंदुभी'मधील तेजस्विनी, 'राजसंन्यास'मधील शिवांगी या भूमिका चांगल्याच गाजविल्या. त्यांना कोल्हटकरांनीच मास्टर ही उपाधी बहाल केली आहे. त्यानंतर ते मास्टर दीनानाथ मंगेशकर म्हणून ओळखले जाऊ लागले. 


दीनानाथ मंगेशकर यांनी मैफली गाजवल्या आहेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन त्यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. सारंगीवादन, कथ्थक नृत्य, संस्कृत साहित्य हे दीनानाथांचे आवडते छंड होते. तसेच ते एक उत्तम ज्योतिषीदेखील होते. 






दीनानाथांनी 1934 साली 'बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन'च्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'कृष्णार्जुन युद्ध' हा त्यांचा पहिला सिनेमा. या सिनेमात त्यांनी अर्जुनाची भूमिका साकारली होती. त्यांच्या सिनेमांतील अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत. 


प्रसिद्ध क्रिकेटपटू सी. के. नायडू हे मास्टर दीनानाथांचे खास मित्र होते. त्यांची मॅच बघायला दीनानाथ जायचे. तसेच दीनानाथांची नाटकं पाहायला सी.के. नायडू सिनेमागृहात जात असे. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या 42 व्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेतील कस्तुरे वाड्यात निधन झाले. 


संबंधित बातम्या


Deenanath Mangeshkar Awards : राहुल देशपांडे यांना यंदाचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर