Haridwar Maha Kumbh 2021: हरिद्वारमध्ये सुरु असणाऱ्या कुंभ मेळ्यामध्ये दुसऱ्या शाही स्नान पर्वाची सुरुवात झाली आहे. या दिवसाचं औचित्य साधत मोठ्या संख्येनं साधू - संत गंगा नदीत स्नान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्येच कोरोनाचं संकट असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं इथं सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वार येथे असणाऱ्या हर की पौडी भागात दुसऱ्या शाही स्नानासाठी अनेकांनीच गर्दी केली आहे, त्यामुळं इथं सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जात असल्याची हमी देणं कठीण असल्याचं स्पष्ट मत कुंभ मेळ्यातील आयजी संजय गुंज्याल यांनी माध्यमांना दिली. 'आम्ही कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याच्या सूचना आणि त्यासाठीचं आवाहन सातत्यानं करत आहोत. पण, इथं आलेल्या श्रद्धाळूंची संख्या पाहता वस्तूस्थिती हीत आहे की कोणत्याही घाटावर सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाही आहे.', अशा परिस्थितीमध्ये श्रद्धाळूंवर दंडात्मक कारवाई केली जाणंही कठीण असल्याची माहिती गुंज्याल यांच्या वक्तव्यातून समोर आली.
सोशल डिस्टन्सिंगचे नियम या भागात लागू करण्यात आल्याचे प्रयत्न केल्यास इथं चेंगराचेंगरीचं संकट ओढावलं जाऊ शकतं. त्यामुळं या भागात अशा पद्धतीचे नियम लावण्यात आपण असमर्थ असल्याचं यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
निर्धारित वेळेसाठी या भागात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला गेल्यानंतर विविध साधूंचे आखाडे इथं शाही स्नानासाठी आले आहेत. त्यामुळं एकंदर ही परंपरा जपत असताना कोरोनाच्या संकटाचा मात्र सर्वांना विसर पडत असल्याचं चित्र आहे.
Coronavirus Updates: देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा विक्रमी वाढ, 24 तासांत 904 जणांचा मृत्यू
काय आहे उत्तराखंडमधील कोरोनाची स्थिती?
रविवारी दिवसभरात उत्तराखंडमध्ये 1333 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं येथील एकूण कोरोनाची रुग्णसंख्या 1,08,812 वर पोहोचली आहे. सध्या इथं कोरोनाचे 7,323 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाची ही आकडेवारी पाहता परिस्थिती नियंत्रणात आहे, असं दिसत असलं तरीही येत्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा अशाच पद्धतीनं उडत राहिल्या होत्याचं नव्हतं व्हायला मात्र वेळ लागणार नाही.