Coronavirus Updates: देशात काही दिवसांपूर्वी नियंत्रणात आलेला कोरोना संसर्ग आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नव्यानं कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात दिवसागणित अधिकाधिक भर पडत असल्यामुळं आता प्रशासन आणि आरोग्ययंत्रणांपुढे मोठी आव्हानं उभी राहत आहेत. केंद्रीय आरोग्य विभागानं नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्यामुळं आता कोरोनाची धास्ती आणखी वाढली आहे. 


आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागच्या 24 तासांत 1,68,912 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर, 904 रुग्णांचा कोरोनानं मृत्यू झाला. 75,086 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मातही केली. कोरोना रुग्णसंख्येत पडलेली ही भर पाहता, देशातील रुग्णसंख्येचा आकडा 1 कोटी 35 लाखांच्याही पलीकडे गेला आहे. 


Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय


आजच्या दिवशी असणारी देशातील कोरोना स्थिती... 


- एकूण रुग्णसंख्या - 1 कोटी 35 लाख 27 हजार 717
- कोरोनावर मात केलेले रुग्ण- 1 कोटी 21 लाख 56 हजार 529
- सध्याची सक्रिय रुग्णसंख्या- 12 लाख 1 हजार 9
- एकूण मृत्यू - 1 लाख 70 हजार 179






कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणास वेग... 


कोरोना विषाणूचा संसर्ग देशात अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही वेगानं सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुन देशात सध्या लस उत्सवही सुरु आहे. लसीकरणाचा फायदा जास्ती जास्त लाभार्थिंपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल यावर या मोहिमेतून भर देण्यात येत आहे. दरम्यान, भारतात अतिशय वेगानं लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मागील 85 दिवसांत देशभरात जवळपास 10 कोटी लसी वापरात आणण्यात आल्या असल्याची माहिती केंद्राकडूनच प्रसिद्ध करण्यात आली होती.