मुंबई : आज अखेर महाराष्ट्र सत्तास्थापनेच्या  पेचाला पूर्णविराम मिळाला आहे. महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकमेकांवर विश्वास ठेवून देशात एक वेगळा विचार आपण ठेवत आहोत. ज्यांच्यासोबत 30 वर्ष मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण जे 30 वर्ष विरोधक होते त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी शरद पवार, सोनिया गांधी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे त्यांनी आभार मानले.


आपण सगळी मैदानातली माणसं आहोत, त्यामुळे आपल्या खेळायचं कसं हे सांगायची गरज नाही, असे ठाकरे यावेळी म्हणाले. विजयानंतर बाळासाहेबांची आठवण येत आहे, असेही ते म्हणाले. गरज सरो आणि वैद्य मरो अशी भाजपची वर्तणूक होती, असेही ते म्हणाले. शिवसेना आणि भाजपमध्ये काही ठरलंच नाही असं देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आज मनाला लागले. मी खोट्याची साथ देणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल.  भाजपला सेनेबद्दल द्वेष आहे. गरजेवेळी सेनेचा वापर केला, असेही ते म्हणाले.

जीवनात कमावले काय आणि गमावले काय हे आज समजले, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. आपले सरकार हे एक कुटुंब आहे . सर्व सामान्य माणसाला माझे सरकार आहे असे वाटले पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार असल्याचे देखील ते म्हणाले. मोठ्या भावाला(नरेंद्र मोदी)ही दिल्लीमध्ये जाऊन भेटणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

ज्या वेळेला मी संघर्षात असतो तेव्हा मला नेहमी विचारले जाते की संघर्षात तुम्हाला बाळासाहेबांची आठवण येते का? मला संघर्षात नाही पण संघर्षात विजय मिळविल्यानंतर मला बाळासाहेबांची आठवण येते. बाळासाहेब म्हणायचे विचार करून शब्द दे आणि एकदा शब्द दिला की प्राण गेला तरी बेहत्तर, दिलेला शब्द नाही पाडायचा. मला आपल्या सगळ्यांच्या साथीची, सोबतीची, सहकार्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला पुसायचे आहेत. हे जे सरकार आपण बनवणार आहोत, किंबहुना बनलेले आहे, मला नाही वाटत एवढे ज्येष्ठ नेते या आधीच्या सरकारमध्ये राहिलेले असतील, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

माझं सरकार म्हणजे आपल्या सर्वांचे सरकार हे कुणाशीही सुडाने वागणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.