Kashmir Killings : जम्मू आणि काश्मिरमध्ये (Jammu Kashmir) सध्या तणावाचं वातावरण आहे. आता दहशतवाद्यांनी एका पोलिसाची हत्या केली आहे. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी पोलीस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोळीबार केला. यामध्ये पोलीस निरीक्षक फारूख अहमद मीर यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी फारूख अहमद मीर यांच्या घरातून त्यांचं अपहरण केलं. यानंतर शेतात नेऊन त्यांच्यावर गोळीबार केला.


टार्गेट किलिंगमुंळे चिंता वाढली
ही घटना रात्री उशिरा घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची चिंता वाढली आहे. कारण गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे अनेक नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया काही दिवस थांबली होती. मात्र आता एका उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर पोलीस आणि लष्करासमोरील आव्हान आणखी वाढलं आहे.


यापूर्वी 07 मे रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून जखमी केलं होते. या घटनेबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर 13 मे रोजी दहशतवाद्यांनी रियाझ अहमद नावाच्या जवानाची हत्या केली होती. मात्र, रविवारी झालेल्या चकमकीत रियाझच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यासह तिघांना सुरक्षा दलांनी ठार केलं. त्यांच्याकडून शस्त्रंही जप्त करण्यात आली आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून घाटीमध्ये दहशतवादी अधिक सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्षा दलाकडूनही त्यांनी वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून टार्गेट किलिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सध्या या घटना थांबल्या आहेत. मे महिन्यापासून आतापर्यत सातहून अधिक जणांची टार्गेट किलिंगमध्ये हत्या करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या