ENG vs NED: नेदरलँड्स आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (England tour of Netherlands) सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं 232 धावांनी विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात इंग्लंडचा स्टार फलंदाज जोस बटलरनं (Jos Buttler) 70 चेंडूत नाबाद 162 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात वेगवान 150 धावांचा विक्रम करण्यासाठी तो फक्त एक चेंडू हुकला. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सनं (AB de Villiers) एकदिवसीय सामन्यात 64 चेंडूत 150 धावांचं शिखर गाठलं होतं. तर, बटलरनं 65 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. बटलर हा जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्यानं दोन वेळा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 76 किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठलाय. 


इंग्लंडची आक्रमक फलंदाजी
नेदरलँड्सविरुद्ध अॅमस्टेलवीनच्या व्हीआरए क्रिकेट ग्राउंडवर खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा त्यांचाच विश्वविक्रम मोडलाय. या सामन्यात इंग्लंडनं 50 षटकात चार विकेट्स गमावून नेदरलँड्ससमोर  498 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात बटलर व्यतिरिक्त फिलिप सॉल्ट आणि डेव्हिड मलान यांनीही शतके झळकावली. तर, लियाम लिव्हिंगस्टोननं 22 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली. नेदरलँड्स्सकडून कर्णधार पीटर सीलरने दोन विकेट्स घेतल्या.


इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर नेदरलँड्स्सचा संघ 266 धावांवर ढेर
इग्लंडनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँड्स्सच्या संघ 49.4 षटकांत 266 धावांत आटोपला. इंग्लंडनं हा सामना 232 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मोईन अलीनं तीन, तर डेव्हिड विली, रीस टोपले, सॅम करन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, डेव्हिड मलानला एक विकेट्स मिळाली. या सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या जोस बटलरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.


हे देखील वाचा-