Chhatrapati Sambhaji Nagar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, महत्वाच्या नेत्यांचे दौरा देखील वाढले आहे. दरम्यान, मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शाह (Amit Shah) यांचे एकापाठोपाठ दौरे असणार आहे. 12 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे तर 15 फेब्रुवारीला अमित शाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची शहरातील मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडले जाणार असल्याची चर्चा आहे. 


उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभरात जनसंवाद दौरा करत आहेत. दरम्यान, 12 फेब्रुवारीला ते छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहे. गंगापूर -रत्नपुर, वैजापूर, कन्नड- सोयगाव , छत्रपती संभाजीनगर पूर्व पश्चिम आणि मध्य विधानसभा मतदारसंघातील जनतेशी यावेळी ते संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत,  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन,  जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी,  राजेंद्र राठोड  यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


अमित शाहांची जाहीर सभा...


उद्धव ठाकरेंपाठोपाठ अमित शाहा हे देखील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. 15 फेब्रुवारीला अमित शाहा संभाजीनगरचा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांची जाहीर सभा देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे. संभाजीनगरच्या खडकेश्वर भागातील मराठवाडा संस्कृतीक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या सभा गाजल्या आहेत. आता त्याच  मैदानावर अमित शाहा यांची सभा होत आहे. पाच महिन्यापूर्वी देखील अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा होणार होता, 17 सप्टेंबरला हा दौरा होणार होता. मात्र, यादिवशी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला होता. 


असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...



  • उद्धव ठाकरे यांचे सोमवारी सकाळी 10  वाजता विमानाने संभाजीनगर शहरात आगमन होईल. 

  • दुपारी 12 वाजता गंगापूर येथे जनतेशी संवाद साधतील

  • त्यानंतर दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद साधतील

  • त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कन्नड येथे संवाद साधणार आहेत. 

  • सायंकाळी 7.30 वाजता छत्रपती संभाजीनगर शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य विधानसभेतील एकत्रित संवाद सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Uddhav Thackeray : 'सबका साथ मित्र का विकास', मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल