छत्रपती संभाजीनगर : शहर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) आता केंद्रबिंदू बनला आहे. दरम्यान, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेल्या शिंदे समितीच्या आदेशानुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्याचे अहवाल आता तयार झालेले आहेत. याबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त यांनी आज सकाळी 11 वाजता बोलावलेली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण, सापडलेले पुरावे,  प्रमाणपत्र वाटपाची गती या सगळ्या बाबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर मराठवाड्याच्या या आठही जिल्ह्यातील अहवालाचा एकत्रीकरण करून विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे शिंदे समितीला आणि राज्य सरकारला सादर करण्यात येईल. त्यामुळे शिंदे समिती आज छत्रपती संभाजीनगर शहरात येणार आहे. 


मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन देखील वेगाने कामाला लागले आहे. सोबतच कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत नेमण्यात आलेली शिंदे समिती देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करतायत. दरम्यान, सुरवातीला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम शिंदे समतीच्या वतीने हाती घेण्यात आले होते. तर, शिंदे समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 76 तालुक्यात तब्बल 8 हजार 126 गावात हे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी ही दिलासादायक बाब असल्याचे बोलले जात आहे. तर, या संदर्भात आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. 


शिष्टमंडळ देखील आजच येणार... 


कुणबी प्रमाणपत्रासाठी नेमण्यात आलेली शिंदे समिती आज छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात महत्त्वाची बैठक घेणार आहे. तर, दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ देखील आजच छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. हे शिष्टमंडळ मनोज जरांगे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जात. त्यातल्यात्यात या सर्व घडामोडी छत्रपती संभाजीनगर शहरात घडतायत हे विशेष आहे.


मराठवाड्यात सापडलेल्या नोंदी...


शिंदे समितीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात कुणबी जातीचे दाखले शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2313946, जालना 1974391, परभणी 2073560, हिंगोली 1214113, नांदेड 1513792, बीड 2233035, लातूर 2073464, धाराशिव 4049131 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. ज्यात एकूण 14976 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तारीख पे तारीख! अखेर आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला येणार; टाईम बॉन्ड देण्याची शक्यता